शरद पवारांच्या दोन मोठ्या नेत्यांना सरकारकडून PA:पगारही होणार सरकारच्या तिजोरीतून, पाटील आणि बावनकुळेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र जयंत पाटील यांनी पक्ष प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. यावर या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असे जयंत पाटील यांनी म्हटले. सांगली जिल्ह्यातील महसूल संदर्भात काही प्रश्न होते, त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी मी बावनकुळे यांची भेट घेतली, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच या भेटीवेळी माझ्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझा स्टाफ होता. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी या भेटीनंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेते उत्तम जानकर यांना सरकारकडून पीए देण्यात आल्याचे समजते. इतकेच नव्हे तर या पीएंचा पगार देखील सरकारी तिजोरीतून देण्यात येणार असल्याचे समजते. या घटनांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, उत्तम जानकर यांनी ईव्हीएमच्या विरोधात मोठे आंदोलन केले होते तसेच निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची देखील त्यांनी मागणी केली होती. तसेच जयंत पाटील यांनी देखील विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा घोळ करण्यात आल्याचा आरोप केला होता. मात्र त्यानंतर आता या भेटीमुळे जयंत पाटील महायुतीमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्रात सध्या महायुतीमधील घटक पक्षांमध्ये नेत्यांचे इनकमिंग सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटातून अनेक नेते व माजी आमदार हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. तसेच अमोल मिटकरी यांनी देखील अनेक आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अजित पवारांच्या नेतृत्वात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे.