शिंदे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ‘वॉर’ सुरू:खासदार संजय राऊत यांचा दावा; म्हणाले – ‘फडणवीसांनी ठाकरेंचे अभिनंदन करायला हवे’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे बोलायचे ते बोलू द्या. त्यांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू द्या, कारण त्यांना दुसरे काम नाही. मात्र, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसा वॉर किंवा युद्ध सुरू आहे, हे स्पष्ट दिसत आहे. ते रोजच दिसून येत असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, या आधीच्या सरकारने विशेषतः नगर विकास विभागाने जे निर्णय घेतले होते. ज्यामुळे भ्रष्टाचार होत होता, असे निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी थांबवले आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत केले आहे. अशाच निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी देखील स्थगिती दिली होती. ज्यातून भ्रष्टाचाराला चालना मिळेल, त्यातून दलालांना चालला मिळेल, अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करायला हवे होते. ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराला चालना देणारे निर्णय तुम्ही थांबवले, याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन केले असल्याचे ते म्हणाले. आम्ही रडीचा डाव खेळत नसल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्राला तसे महत्त्व राहिलेले नाही. जे मुख्यमंत्री बोलतात त्याला महत्त्व असते. त्यामुळे एकनाथ शिंदे आता कोण आहेत? त्यांचे आता कोणीही ऐकणार नाही. ते केवळ लिहून दिलेले भाषण वाचतात. याच्यातून काहीही साध्य होणार नाही. शिंदे यांनी राज्यासाठी काय केले? जनतेसाठी काय केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बहिरजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार विकत घ्यायचा, यापलीकडे त्यांचे भविष्य काय? असा प्रश्न देखील राऊत यांनी विचारला आहे. या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.