शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधीपक्ष नेते पदावर दावा:भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब, अडीच वर्षांचा फॉर्म्युला असणार का?

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटाने दावा केला असून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार भास्कर जाधव हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणार आहेत. त्यानुसार अशा आशयाचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे. तसेच कॉंग्रेसने देखील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावे अशी मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षात विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ नाही. त्यामुळे आतापर्यंत विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय झाला नव्हता. मात्र, आता शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यात आला आहे. त्यावर आता अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानभवन प्रांगणात उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. साहजिकच आहे कॉंग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो महाविकास आघाडी म्हणून पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही एकत्र करणार आहोत. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, आज आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची मागणी केली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचे पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय होईल आणि बजेटपूर्वी कारण बजेटमध्ये विरोधीपक्ष नेता असायला पाहिजे ज्यामुळे जनतेच्या बाजूने बोलू शकेल. त्यामुळे आम्ही अपेक्षा अशी करत आहोत की मुख्यमंत्री ज्या प्रमाणे स्वच्छ कारभार करत आहेत, भ्रष्टाचार विरोधात असेल परवाच त्यांनी सांगितले की कोणीही गुंड असला, कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला कोणतीही दया माया दाखवली जाणार नाही. त्याच पद्धतीने त्याच हिंमतील जागून याही प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला आहे का? विरोधी पक्षनेते पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला आहे का, असा प्रश्न विचारला असता त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, असे काही नाही. म्हणून मी म्हणालो आहे की आम्ही एकत्रित पुढे जाणार आहोत. पुढे बऱ्याच गोष्टी आहेत निवडणुका आहेत तेव्हा पुढे बघूया. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला आदित्य ठाकरेचे नाव चालले असते हे मला आधी माहीत असते तर बरे झाले असते. म्हणजे घराणेशाहीला त्यांचा विरोध नाही हे आधी माहीत असते तर बरे झाले असते.