शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर वारंवार मीठ चोळले:पगारवाढीतही केली फसवणूक, श्रीरंग बरगे यांची सरकारवर टीका

शासनाने नुकताच एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय घेतला. 1 एप्रिल 20 पासून हा निर्णय लागू होईल असे जाहीर केले.पण वेतनवाढ प्रत्यक्ष एप्रिल 24 पासून देऊन कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप करत शासकीय कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्या, वेतनवाढीचा फरक द्या, एमआयडीसीने जाहीर केलेले स्थानक परिसर काँक्रीटीकरण करण्याचे 500 कोटी एसटीकडे वळते करावेत अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी शहरात आले होते. यावेळी त्यांनी शासनाने वेतनवाढ एप्रिल 2020 पासून लागू केल्याची घोषणा केली, परंतु ही वेतनवाढ एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे. ही एस टी कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक आहे.त्याचबरोबर वार्षिक वेतनवाढ प्रलंबित फरकाबद्दल स्पष्टता नाही, 2016 पासूनची वार्षिक वेतनवाढ फरक रक्कम प्रलंबित असून 2018 पासूनची महागाई भत्त्याची फरक रक्कमही प्रलंबित आहे. या दोन्ही रक्कमा अंदाजे 800 कोटी रुपयांची होते. ही रक्कम देण्यात कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली असून सरकारने लबाडी केल्याचा आरोपही बरगे यांनी केला. 500 कोटी एसटीकडे वळते करा एमआयडीसीने क्राँक्रीटकरणांसाठी एसटीला 500 कोटी देण्याची घोषणा केली. ती रक्कम एसटीकडे न देता परस्पर 190 ठिकाणी कामे सुरू केली. ही कामे दर्जाहीन यात मोठ्या प्रमाणात अपहार होत आहे. ही रक्कम त्यांनी एसटीकडे वळती करावी, तसेच ई बसच्या प्रोजेक्टमध्ये प्रति किलोमीटर 40 रुपयांचा तोटा एसटीला सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रोजेक्टचाही पूनर्विचार करावा अशीही मागणी बरगे यांनी केली. 3 हजार कर्मचारी पीएफ पासून वंचित गेल्या दहा महिन्यांपासून महामंडळाने पीएफची रक्कम भरली नसल्याने कर्मचाऱ्यांना घर बांधणे किंवा लग्नकार्यासाठी गेल्या जुलै महिन्यांपासून पैसे मिळत नाहीत. असे 3 हजार कर्मचारी या लाभापासून वंचित आहेत. असेही बरगे यांनी या वेळी सांगितले. संघटनेचे उपाध्यक्ष जेम्स अंबिलढगे, वसंत बोराडे, बालाजी ढेपे, राजेंद्र वहाटूळे, कमलाकर पटवर्धन, दीपक जगदाळे, आर. पि सय्यद, महेश बिराजदार, विष्णू घुले, बळीराम कांदे, आनंद तिगोटे, देविदास जटाळे, आदी पदाधिकारी हजर होते.

Share

-