सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट मस्साजोगमध्ये:संतोष देशमुखांच्या आरोपींना 2-3 अटक केली जाईल, कुटुंबीयांना केले आश्वासित
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राजकारणाला आणू नका. विरोधक काय म्हणतात, सत्ताधारी काय म्हणतात, मला यामध्ये रस नाही. या प्रकरणातील आरोपी, मग तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. त्यानंतर या प्रकरणात ज्यांचा हात असेल, त्यांना सरकार माफ करणार नाही. येत्या 2-3 दिवसांत आरोपींना अटक केली जाईल, असेही संजय शिरसाट म्हणाले. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच आरोपींना लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले. यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी आणि माध्यमांशी संवाद साधला. संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे. याप्रकरणी आरोपीला अटक झाल्याचे समजते आहे. पण अद्याप याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मी याची आणखी परिपूर्ण माहिती घेत आहे. त्यानंतरच याबद्दल बोलेन, असे संजय शिरसाट यांनी म्हटले. धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले शिरसाट?
धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत मस्साजोग येथे भेट दिली नाही. यामागे काय कारण असेल? तुमची त्यांच्याशी काही चर्चा झाली का? असा सवाल संजय शिरसाट यांना विचारला असता, मी कुणाशीही चर्चा केलेली नाही. मला एकनाथ शिंदे यांनी पाठवले आहे. त्यानुसार मी याठिकाणी आलो. पोलिस अधिक्षकांशी चर्चा केल्यानंतर मी थेट येथे आलो, असे उत्तर संजय शिरसाट यांनी दिले. बीडमध्ये पुन्हा दहशत निर्माण होईल
तुम्ही मस्साजोगमध्ये जाऊन वस्तुस्थितीचा अहवाल आम्हाला द्या, असे एकनाथ शिंदे यांनी मला आणि उदय सामंत दोघांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. कुटुंबाची भेट घेणे, त्यांना दिलासा द्या, असेही शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितले. संभाजीनगरहून येथे येत असताना मी सतत संतोषचे फोटो बघत होतो. ते बघून माझ्या मनात चीड येत होती की, इतक्या अमानुषपणे संतोषला कोण मारु शकते. त्याच्या डोळे आणि पाठीवरचे वर्ण पाहिले. जर हे असेच वातावरण राहिले तर बीडमध्ये पुन्हा तीच दहशत निर्माण होईल, असेही संजय शिरसाट म्हणाले. आरोपींना लवकर अटक करणार
आरोपी कोणीही असेल त्याला सोडणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. हे लोण दुसरीकडे पसरू नये, यासाठी या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच बीडमध्ये अनेक लोक या धंद्यामध्ये गुंतले आहेत. आरोपींनी लवकर अटक करणार आहे, असे इथल्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले असेही संजय शिरसाट यांनी सांगितले. या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक?
कोण कोणत्या पक्षाचा आहे, हा विषय आपल्या समोर नाही. या प्रकरणाकडे आपण माणुसकी म्हणून पाहणार आहोत. बीडमध्ये नोकरी करण्यास अधिकारी येत नाहीत. एवढी दहशत आहे. लोकांनी आता बीडचे राजकारण बदलले पाहिजे. संतोष यांची हत्या दुर्दैवी आहे. याप्रकरणी आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन मी देतो. याप्रकरणी एकाला अटक केल्याचेही समजते. पण अद्याप याबद्दल ठोस माहिती नाही. म्हणून मी यावर बोलणार नाही. न्यायाला दाबण्याचा प्रयत्न करू नका, असेही संजय शिरसाट म्हणाले.