राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना 4066 आधार किट मिळणार:माहिती तंत्रज्ञान विभागाची माहिती, पुण्याला मिळणार सर्वाधिक किट
राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी 4066 नव्या आधार किटचे वाटप करण्यात येणार आहे. येत्या 10 फेब्रुवारी रोजी हे वाटप करण्यात येणार आहे. याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव पराग जैन नैनुटीया यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड नूतनीकरण करणे, पत्ता बदलणे, अशा विविध सेवा देणारी ई सेंटर राज्यभर सुरू असून यासाठी लागणारी 3,873 आधार कार्ड किट सन 2014 साली जिल्हाधिकारी कार्यालयाना उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यापैकी सुमारे 2,558 किट सध्या वापरात असून 1,315 किट नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 2,567 नव्या किटची मागणी करण्यात आली होती. याबाबत ग्रामीण भागातून आलेल्या मागण्या लक्षात घेत आढावा बैठक घेण्यात आली आहे. आता येत्या 10 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आधार किटचे वाटप केले जाणार आहे. सध्या युआयडीआय टेस्टिंगची प्रक्रिया सुरू आहे. पुणे जिल्ह्याला सर्वाधिक 338 किट देण्यात येणार आहेत, तर भंडारा जिल्ह्याला सर्वात कमी 23 किट देण्यात येणार आहेत. पुणेनंतर लातूरला सर्वाधिक 271 किट देण्यात येणार आहेत. राजधानी मुंबई शहरात 103 आधार किट देण्यात येणार आहेत. कोणत्या जिल्ह्याला किती आधार किट?
अहिल्यानगरला 34 अकोला 78, अमरावती 109, छत्रपती संभाजीनगर 134, बीड 58, भंडारदरा 23, बुलढाणा 124, चंद्रपूर 74, धुळे 113, गडचिरोली 44, गोंदिया 48, हिंगोली 88, जळगाव 167 ,जालना 104, कोल्हापूर 188, लातूर 271, मुंबई शहर 103, मुंबई उपनगर 122, नागपूर 91, नांदेड 112, नंदुरबार 90, नाशिक 49, उस्मानाबाद 73 आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांना 153, परभणी 55, पुणे 338, रायगड 63, रत्नागिरी 59, सांगली 130, सातारा 132, सिंधुदुर्ग 160, सोलापूर 146, ठाणे 400, वर्धा 50, वाशिम 100, यवतमाळ 83 किट उपलब्ध होणार आहेत.