स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न हवे- प्रा. देशमुख:गावंडे महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमात मार्गदर्शन

गुलामीच्या जोखडातून भारतीय स्त्रियांची सुटका करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले आयुष्य खर्ची घातले. भारतीय संविधानाने स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला. त्यामुळे संविधान निर्मिती नंतर स्त्रियांची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात बरीच प्रगती झाली, त्यामध्ये आणखी सुधारणेची गरज असून पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीकडे बघण्याच्या संकुचित दृष्टीकोनात बदल होणे गरजेचे आहे, असे मत वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शुभांगी देशमुख यांनी व्यक्त केले. येथील स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास विभाग प्रमुख डॉ. रवींद्र झनके हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. कु. शीतल सगणे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. परमेश्वर गायकवाड, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राजू पोपळघट व प्रा. सचिन गवई उपस्थित होते.पुढे बोलतांना त्यांनी वर्तमान युगात स्त्रियांना संरक्षण व आत्म सन्मानाची जास्त गरज असून स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी सार्वत्रीक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र झनके यांनी विद्यार्थिनींनी जीवनात उच्च ध्येय ठेवून ते गाठण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले. तर प्रा. कु. शीतल सगणे यांनी विद्यार्थिनींना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची गरज असून कुठलीही भीती न बाळगता आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. प्रा. सचिन गवई यांनी व्यक्त होणे ही स्त्रीची सर्वात मोठी गरज असून आपण आपल्या भावनांच्या प्रकटीकरनाला महत्व देऊन स्वताचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजू पोपळघट यांनी तर सूत्रसंचालन अपूर्वा भोपळे हिने व आभार सारिका इंगळे हिने मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थींनी उपस्थित होत्या.