मना विरोधात घडत असताना पुढे जाणारा खरा कार्यकर्ता:मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया, सांगितली पुढील भूमिका
राज्यात महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार तसेच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद डावलल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे नागपुरात उपस्थित असून देखील सुधीर मुनगंटीवार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गैरहजर असल्याचे समोर आले आहे. पावला पावलांवर मना विरोधात घडत असताना जो पुढे जातो तो खरा कार्यकर्ता, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारणा केली असता, त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी नाराज असण्याचे करण नाही. पक्षाने जे आदेश दिले, जी जबाबदारी दिली त्यांचे पालन करणे हेच मइ आजवर करत आलो आहे. मात्र आज विधिमंडळाचे फार काही काम नसल्याने मी गैरहजर राहिलो असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मला याची जाणीव आहे की मी तेथे हजार राहिल्याने अनेक प्रश्न कारण नसताना मला विचारले जाऊ शकतील, त्यामुळे या प्रश्नांची उत्तर देण्यापेक्षा मौनं सर्वार्थ साधनम् प्रमाणे शांत राहणे मी पसंत केले. मी कुठेही नाराज नाही. गेली 15 वर्ष आम्ही विरोधात होतो. जी जबाबदारी मला देण्यात आली ती निष्ठेने मी पार पाडली आणि पुढेही पाडेल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पक्षाने कायम प्रेम दिले आणि मीही जीव ओतून काम केले. शपथविधीपूर्वी मला मंत्रिपद देणार असे सांगण्यात आले होते. कदाचित जवी जबाबदारी देण्यात येणार असेल म्हणून ते झाले नसेल. मला मंत्रिपद मिळणार नाही असे कधीच सांगितले नाही. 1995 पासून मी लोकांमधून निवडून येत प्रतिनिधित्व करत असल्याचेही यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मला प्रमोद महाजन यांचे एक वाक्य फार आवडते. पावला पावलांवर मना विरोधात घडत असताना जो पुढे जातो तो खरा कार्यकर्ता, हे वाक्य कायम जपले असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझे बोलणे होत होते, मात्र त्यांनी याबाबत कधी जाणवू दिले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील राजकीय दिशा माझी ‘जिना यहॉं मरना यहॉं’ अशी असणार आहे, असे देखील मुनगंटीवार म्हणाले आहेत.