सुरेश धसांची मुख्यमंत्र्यांसमोर तुफान फटकेबाजी:फडणवीसांचा ‘देवेंद्र बाहुबली’ असा उल्लेख; धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता शरसंधान
बीड जिल्ह्यातील आष्टी येथे उपसा सिंचन योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बहुप्रतिक्षित खुंटेफळ साठवण तलावाच्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी व बोगदा कामाचे भूमिपूजन, तसेच श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) येथील समाधी मंदिराचे भूमिपूजन पार पडले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या भाषणात बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा देवेंद्र बाहुबली असा उल्लेख केला. आम्हाला केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच अपेक्षा आहे, असे सुरेश धस म्हणाले. सुरेश धस म्हणाले, आष्टी तालुक्यातील या योजनेला विरोध करण्यात आला होता. आता आष्टी सिंचन योजनेचा मुख्यमंत्र्यांचा हस्ते शुभारंभ होत आहे. मात्र ही योजना सुरू होत असताना येथील नागरिकांनी मला दगड मारले. अनेकांना हा प्रकल्प नको होता. मात्र, मी ठाम राहिलो आणि त्यासाठी नागरिकांचे मने वळवली. या योजनेसाठी रामदास कदम, प्रवीण दरेकर, प्रीतम मुंडे आणि नितीन गडकरी यांनी या प्रकल्पासाठी आम्हाला मदत केली. जलसंपदा मंत्री असताना एका दिवसात परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना सुरेश धस यांनी अध्यक्ष महोदय असा उल्लेख केला. मात्र यावर एकच हशा पिकला. कधी कधी आम्हाला सभागृहातच बोलत असल्याचे वाटते, असे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवींचा ‘देवेंद्र बाहुबली’ असा उल्लेख केला. सुरेश धस म्हणाले, 2014 मध्ये मी पडल्यानंतर 2024 पर्यंत खुंटेफळ साठवण तलावाचे केवळ 2 टक्के काम झाले. मी निवडून आल्यानंतर आतापर्यंत 23 टक्के काम झाले. देवेंद्र फडणवीस हे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रातील पहिल्या पंपींग मशिनरीची एका दिवसात परवानगी दिली. त्यामुळेच हे काम शक्य होऊ शकले. देवेंद्र बाहुबलीशिवाय कुणाकडूनही अपेक्षा नाही 23.66 पैकी केवळ 7 टीएमसी पाणी मराठवाड्याला दिले आहेत. त्यातील 1.68 टीएमसी आम्हाला आले. 7 टीएमसी पाणी अजून तिकडेच अडकवले आहे. ते 7 टीएमसी आणि आणखी 9.66 टीएमसी पाणी दिले, तर बीड जिल्हा, बीडमधील आष्टी तालुका आणि धाराशीवमधील 5 तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. ही आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे, असे सुरेश धस म्हणाले. आम्हाला इतर कुणाकडूनही अपेक्षा नाही. इतरांकडून मिळणारही नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. मी देखील फडणवीसांचा लाडका मुख्यमंत्री आणि सभागृहात माझे नाव घेऊन या योजनेसाठी 300 कोटी रुपये दिले असल्याची माहिती देखील सुरेश धस यांनी दिली. प्रशांत बंब यांची योजना एका झटक्यात मंजूर केली. ते तुमचे लाडके आहेत, तसा मी देखील लाडका आहे. मला जायकवाडीतून 3.57 टीएमसी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्यावे, अशी मागणी सुरेश धस यांनी यावेळी केली. मुंडे साहेबांनी ही जमीन सोडवून घेतली सध्या बीड जिल्ह्याची बदनामी होतेय असे काहीजण म्हणतात. या जिल्ह्याने क्रांती सिंह नाना पाटील निवडून दिले, बबनराव ढाकणे दिले, प्रमोद महाजन यांच्यासारखा उंचाचा माणूस दिला. गोपीनाथराव मुंडे एवढा पहाडासारखा माणूस दिला, आज ज्या जमिनीवर ह्या कामाचा शुभारंभ होतोय, प्रकल्प उभारतोय ती जमीन रक्षा विभागाकडे जाणार होती, पण जॉर्ज फर्नांडिस हे रक्षा मंत्री होते, मुंडे साहेबांनी ही जमीन सोडवून घेतली असे सुरेश धस यांनी सांगितले. बीड प्रकरणावरही केले भाष्य मी जिवंत असेल किंवा नसेल. मात्र या मतदारसंघात कायम भाजपचा आमदार निवडून येईल, असे देखील सुरेश धस ठामपणे म्हणाले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर शरसंधान साधले. ते म्हणाले, ठराविक राजकारणांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यामुळे जिल्ह्याची बदनामी झाली होती. मात्र, संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घेतली. त्यांनी घेतलेली भूमिका सर्वांना आवडली. या प्रकरणात कोणाला सोडणार नाही, या तुमच्या वक्तव्यावर सर्व जनतेचा विश्वास असल्याचे धस यांनी म्हटले आहे. राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मकोका लावला पाहिजे, अशी विनंती सुरेश धस यांनी यावेळी बोलताना केली. ‘मेरे पास देवेंद्र फडणवीस है’ देवेंद्र फडणवीस यांनी मला भरपूर काही दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे कायम राहील, असेही सुरेश धस म्हणाले. सुरेश धस यांनी यावेळी ‘दीवार’ चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यातील डायलॉगचा दाखला दिला. लोक विचारतात ‘तेरे पास क्या है’. मात्र ‘मेरे पास देवेंद्र फडणवीस है’, असे ते म्हणाले. यावेळी आपल्या आईची आठवण काढताना सुरेश धस हे भाऊक देखील झाले होते. फडणवीस दत्त बनून माझ्या पाठीमागे उभे राहिले माझे भाग्य आहे, परमभाग्य आहे 1999 ते 2004 या कालावधील साहेबांच्यासोबत बसण्याची संधी मला मिळाली, त्यांच्या मागे-पुढे मी असायचो. 2019 पासून माझ्यावर, माझ्या कुटुंबावर राजकीय कटकारस्थान करुन त्रास देण्याचा प्रयत्न झाला. पण, आपण माझ्या पाठीमागे दत्त बनून उभे राहिलात, असेही धस यांनी म्हटले. 2019 मध्ये आपला जनादेश चोरून नेला 2019 मध्ये बहुमत येऊन सुद्धा मुख्यमंत्री झाला नाहीत. जनादेश तुमच्या बाजुने होता. पण पहाटेच आमचा जनादेश चोरून नेला. ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी कटकारस्थाने आखली गेली. परंतु, आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला, त्याला तोडच नाही. बिनजोड पैलवान म्हणतात तो पैलवान आहात तुम्ही, असे सुरेश धस म्हणाले.