स्वारगेट बसमधील बलात्कार प्रकरण:आरोपी दत्तात्रय गाडेचा आधी तृतीयपंथी तर आता समलैंगिक असल्याचा दावा; बचावासाठी प्रयत्न

स्वारगेट डेपो परिसरातील बस मध्ये झालेला बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याने आपण समलैंगिक असल्याचा दावा केला आहे. या आधी देखील गाडे याने आपण तृतीयपंथी असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या जबाबात त्याने हा दावा केला आहे. स्वतःचा बचाव कसा करायचा? याबाबत आरोपीला चांगली माहिती असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. वास्तविक दत्तात्रय गाडे याचे लग्न झालेले असून त्याला मूल देखील झाले आहे. मात्र असे असताना आपण समलैंगिक असल्याचा दावा दत्तात्रय गाडे याने पोलिसांसमोर केला आहे. पोलिसांच्या वतीने देखील या प्रकरणात गाडे याच्या विरोधात सबळ पुरावे जमा करण्याचे काम केले जात आहे. त्यासाठीच त्याची लैंगिक क्षमता चाचणी देखील घेण्यात आली आहे. तर त्यानंतर आता त्याची डीएनए चाचणी देखील होणार आहे. दरम्यान आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दत्तात्रय गाडे याच्या बायकोचाही वेगळाचा दावा दत्तात्रय गाडेच्या पत्नीने देखील आरोपीची पाठराखण करत मोठा दावा केला आहे. बसमध्ये चढताना आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला. त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? असा सवाल दत्तात्रय गाडेच्या बायकोने उपस्थित केला आहे. मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे. ती मुलगी म्हणतेय की, माझ्या नवऱ्याने बलात्कार केला आहे. बलात्कार केला तर मग तिचे कपडे कुठे फाटले आहेत का? तिच्या अंगावर काही ओरबाडलेले दिसत आहे का? बसमध्ये चढताना आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला. त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीने उपस्थित केला आहे. त्या पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले असल्याचेही दत्तात्रय गाडेच्या बायकोने म्हटले आहे. तिच्यावर बलात्कार होत होता तर त्या तरुणीने आरडाओरड का केली नाही? असा सवाल देखील गाडेच्या कुटुंबियांनी केला आहे. दत्तात्रय गाडे आणि तरुणी दोघांच्या संमतीने संबंध निर्माण झाल्याचा आरोपीचे वकील आणि पत्नीने दावा केल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. दत्तात्रय गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते – वकिल स्वारगेट बस डेपो मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. या प्रकरणात दत्तात्रय गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते. दोघांमध्ये जे झाले ते संगनमताने झाले असून बलात्कार झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते दोघे एकाच बसमधून खाली उतरले, ते बस मधून कोठे गेले? याची माहिती घेण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या दोघांमध्ये पैशांचा वाद झाला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे पळून गेल नाही तर तो त्याच्या गावी गेला होता. मात्र गावाला पोलिस छावणीचे रूप आल्याने तो लपून बसला, अशी माहिती देखील दत्तात्रय गाडे च्या वकिलांनी न्यायलयात दिली आहे.

Share

-