स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार घोषित:दत्तात्रय गाडेबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाखाचे बक्षीस, पुणे पोलिसांची घोषणा

स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला पुणे पोलिसांनी फरार घोषित केले आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी आता नागरिकांची मदत मागितली आहे. फरार आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दत्तात्रय गाडे याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात आरोपी दत्तात्रय गाडे याने एका 26 वर्षीय तरुणीवर धमकावून शिवशाहीमध्ये बलात्कार केला आणि पसार झाला. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. घटनेच्या 48 तासांनंतरही आरोपी पोलिसांना सापडला नाही. आरोपीच्या शोधासाठी सुरुवातील आठ पथके तैनात केली होती. आता 13 पथके तैनात केली आहे. आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुनाट येथील रहिवासी आहे. त्याच्यावर याआधीच जबरी चोरीचे गुन्हे हे शिरूर आणि शिक्रापूर पोलिस स्टेशन मध्ये दाखल आहे. सध्या तो जामिनावर सुटलेला आहे. दत्तात्रय गाडेवर 1 लाखाचे बक्षीस
फरार आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यासाठी पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. नागरिकांनी कुठल्याही संशयित हालचाली आढळल्यास स्वारगेट पोलिस ठाण्याशी किंवा 100 क्रमांकावर संपर्क साधावा, अशा सूचनाही देण्यात आली आहे. आरोपीबद्दल माहिती सांगणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीच्या मित्र-मैत्रिणींसह आई-वडिलांची चौकशी
दरम्यान, बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सगळ्यांकडून पोलिसांनी दत्तात्रय गाडेबद्दल माहिती काढून घेतली. पोलिसांनी शिरुरमधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला आहे. याशिवाय, दत्तात्रय गाडे याच्या आई-वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेतले आहे. त्यामुळे आता दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात कधी सापडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तरुणीवर एकदा नव्हे दोनदा बलात्कार
स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एक 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पुण्यात काम करणारी तरुणी फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात आली होती. यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे या नराधमाने एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केले होते. यादरम्यान पीडितेची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल रुग्णालयाने बुधवारी सायंकाळी पोलिसांना दिला. आरोपीने पीडितेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती या मेडिकल रिपोर्टमधून समोर आली आहे. सध्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share

-