तानाजी सावंतांची जिल्हा नियोजन बैठकीला अनुपस्थिती:राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, प्रताप सरनाईकांचा टोला
शिवसेना नेते व धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पहिल्या जिल्हा नियोजन बैठकीला तानाजी सावंत उपस्थित नव्हते. तसेच याबाबत त्यांच्याशी आपले काहीही बोलणे झाले नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हंटले आहे. तसेच राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही ती बदलत असते, आदलाबदल होत असते, असा टोला देखील सरनाईक यांनी लगावला आहे. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या पहिल्या जिल्हा नियोजन बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तुळजापूरमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचे देखील यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. तानाजी सावंत हे माजी आरोग्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच जिल्ह्यात पालकमंत्री सरनाईक यांनी पहिला निर्णय आरोग्य विभागाशी संबंधित घेतल्याने याची चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटातील काही नेते शिवसेनेत येऊ शकतात असे संकेत देखील प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ते म्हणाले, धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे आता कोणते नेते ठाकरे गटातून शिवसेनेत जातात याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य सुरू असलेले उघड उघड दिसत आहे. तसेच काहींना मंत्रिपदच मिळाले नाही म्हणून नाराज आहेत. धाराशिव येथील तानाजी सावंत हे माजी आरोग्यमंत्री आहेत, मात्र या वेळेला त्यांना कोणतेच मंत्रिपद मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त देखील केली होती. त्यातच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहून त्यांची नाराजी पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिली असल्याचे दिसते.