बनावट हिबानाम्याचा धक्कादायक प्रकार:परदेशात असलेल्या मालकाचे घर तिघांनी बनावट कागदपत्रांद्वारे केले स्वतःच्या नावावर

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला आहे. मूळ मालक परदेशात असताना त्यांच्या घराचा बनावट हिबानामा तयार करून ते घर स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर बिन अब्दुल्लाह बिन माजी याने नगर भूमापन कार्यालयात एक हिबानामा सादर केला. त्यात मोहम्मद सालेह बिन माजी यांनी त्यांच्या नावे घर केल्याचे दर्शवले होते. कार्यालयाने १६ जानेवारी २०२४ रोजी फेरफार क्रमांक २८७७१ नुसार ही मालमत्ता अमर यांच्या नावावर केली. मात्र ‘आपली चावडी’ पोर्टलवर प्रसिद्ध झालेली मालमत्ता हस्तांतरण नोटीस परदेशात असलेल्या मूळ मालक मोहम्मद सालेह यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ भारतात येऊन १९ जानेवारीला नगर भूमापन कार्यालयात तक्रार केली. त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी कोणताही हिबानामा दिलेला नाही. तपासात उघड झाले की अमर याने १० जानेवारी २०२४ रोजी शंभर रुपयांच्या बाँडवर बनावट हिबानामा तयार केला. या कारस्थानात साल्मीन बिन साबीत बिन माजी आणि फैसल अब्दुल्लाह बिन माजी यांनी साक्षीदार म्हणून सहभाग घेतला. नगर भूमापन अधिकारी समीर दाणेकर यांनी सुनावणी घेऊन फेरफार स्थगित केला आहे. परीरक्षण भूमापक गणेश बहुरे यांच्या तक्रारीवरून या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम कायद्यानुसार हिबा हा स्वखुशीने करणे आवश्यक असताना, या प्रकरणात बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला.