बर्फाचे कपडे घालून थंडीत दावोसला जायची काय गरज:54 सामंजस्य करार झाले त्यातले 43 तर भारतातल्याच कंपन्या, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर युवसेना प्रमुख व ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. 54 सामंजस्य करार करण्यात आले. यातील 43 कंपन्या भारतातल्याच आहेत, तर 11 विदेशी कंपन्या आहेत. एवढ्या कंपन्या भारतातल्या आहेत तर मग मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम का नाही घेतला? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच बर्फाचे कपडे घालून फोटो काढण्यापेक्षा सह्याद्री किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन पैसा कमी खर्च झाला असता असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, बर्फाचे कपडे घालून फोटो काढण्यापेक्षा सह्याद्री किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन पैसा कमी खर्च झाला असता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावाला आणि त्यांचे लाडके मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत होतो. त्यांच्या विभागाचे करार मुख्यमंत्र्यांनी केले. नगरविकास विभागाचे अधिकारी दावोसला आणि मंत्री गावाला, त्यांना निमंत्रण होते की नाही? त्यांना सोबत का नेले नाही? ती नाराजी आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला. आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, एसआरए आणि रस्त्याच्या कॉंट्रॅक्टला सुद्धा पुढच्या वेळेस दावोसला घेऊन जातील असे कळते आहे. टेंडर काढून काम द्या काही ठिकाणी तुम्ही थेट करार करताय. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या आधी उद्योग मंत्री पोहोचायला हेवत. पण ते मुख्यमंत्र्यांच्या नंतर गेले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होते म्हणून उशीरा निघाले का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. उद्योग मंत्री यांचा असा काय कार्यक्रम होता जे तिथे थांबू शकत नव्हते? पक्षांतर्गत नाराजी होती का? मुख्यमंत्री सगळे काम सोडून तिथे थांबत होते, मात्र उद्योगमंत्री का थांबू शकत नाहीत? असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच गेल्या दोन वर्षात मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम झालेला नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेणे गरजेचे आहे असे ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, सल्ला देण्याइतका मी एवढा मोठा नाही. पण इतर राज्यातील मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन मॅग्नेटिक महाराष्ट्र सारखा कार्यक्रम घेतात तो घ्यावा. संपूर्ण चार दिवस करार करण्यामध्ये घालण्यात अर्थ नव्हता. जगभरातले नेते, विविध देशातील उद्योगपती यांच्या भेटीसाठी घेण्यास सुद्धा गरजेच्या आहेत. तो प्रयत्न मी केला होता. मात्र, यावेळी असा कुठलाही प्रयत्न झाला नाही. कोणत्याही भेटी घेतल्या नाहीत. तसेच काही गुंतवणूक चांगल्या झाल्या याचा आनंद आहे. पण काही ठिकाणी गुंतवणूक झाल्यासारखे दाखवून फसवले जात आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Share

-