फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा:चेहऱ्यावर मास्क अन् कपाळी टिळा स्थानिकांच्या दावा, पोलिसांकडून शोध सुरू
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या 3 महिन्यापासून फारार आहे. तो नाशिकमध्ये दिसल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. सहदेवनगरमधील एका मंदिराजवळ तो दिसल्याचे दावा वकील गितेश बनकर यांनी केला आहे. दरम्यान कृष्णा आंधळे हा आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मास्क लावून मंदिराजवळील झाडाखाली एका जणांसोबत उभा होता. मास्क खाली केल्यावर तो कृष्णा आंधळे आहे, अशी मला खात्री पटल्याचे बनकर यांनी पोलिसांनी सांगितले आहे. नेमके काय घडलं? नाशिकमधील गंगापूर रोडवरील सहदेव नगरच्या दत्त मंदिराजवळ कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. गितेश बनकर नावाचे वकील या परिसरातून जात असताना त्यांना दोन तरुण झाडे खाली उभे असल्याचे लक्षात आले. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते. यातील एकाने मास्क काढला असता तो कृष्णा आंधळे असल्याचे आपल्याला लक्षात आले. पण स्थानिक नागरिकांनी हटकल्यानंतर मोटारसायकल वरून तो पळून गेल्याचा दावा देखील स्थानिकांनी केला. यानंतर स्थानिकांनी गंगापूर पोलिसांना ही माहिती दिली.गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करून पोलीस खातरजमा करत आहेत. कृष्णा आंधळेने तोंडाला मास्क आणि कपाळी टिळा लावला होता, असे वर्णन स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 26 तारखेला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या प्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले असून मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला केले आहे. या प्रकरणात 9 आरोपी असून आठ जणांना अटक झाली आहे. मात्र, हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेला कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. खंडणीसाठीच ही हत्या घडवण्यात आली हे स्पष्ट झाले असून हत्येवेळीचे फोटो दोषारोपपत्रातून समोर आलेत. यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी झाली. याप्रकरणाची पुढील सुनावणी 26 तारखेला होणार आहे.