भाजप कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले:महायुतीच्या शपथविधीला येण्याचे फडणवीसांकडून अग्रीम आमंत्रण; मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ नाऱ्यामुळे विजयाचा दावा

महाराष्ट्रातील विजयाकरीता ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचे अक्षरशः पाणी केले, त्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात विजयाचा जल्लोष साजरा केला. राज्यातील अभुतपूर्व विजयानंतर प्रदेश भाजपच्या मुख्यालयात देवेंद्र फडणवीस यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आम्ही मोदींच्या पाठीशी असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले, असे देखील ते म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही साष्टांग दंडवत घालत असल्याचे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटीव्हला आम्ही योग्य उत्तर देऊ शकलो नाही. त्यामुळे या महाराष्ट्रात आम्हाला आवश्यक असलेले यश मिळाले नाही. हा संपूर्ण देश नरेंद्र मोदी यांच्या सोबत असताना आम्ही चुकलो हे दुःख आम्हाला होते. देश मोदींसोबत जात असताना महाराष्ट्रात त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळवून देऊ शकलो नाही. त्याच वेळेस आम्ही या फेक नरेटीव्हला उत्तर देण्याचे आम्ही ठरवले होते. आणि आता तसे उत्तर देऊन दाखवले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. या सर्वांत राष्ट्रहिताच्या, राष्ट्र प्रेमाने ओतप्रोत झालेल्या सर्व संघटनांचे आम्ही आभार मानत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्या फोर्सेस भारत जोडोच्या नावाने लोकांना तोडण्याचा प्रयत्न करत होते, महाराष्ट्र राज्यात अराजकतेचे बीजारोपण करत होते. त्यांच्याविरुद्धही लढाई सुरू झाली आणि सर्व राष्ट्रवादी एकत्र आले. त्यांचीच राज्यात हे चालू शकत नसल्याचे दाखवून दिले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सर्व राष्ट्र विचारांच्या संघटनांचे आभार देखील त्यांनी मानले. लाडक्या बहिणींचे आभार ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला मोठा आशीर्वाद दिला, त्या सर्वांचे देखील आम्ही आभार मानत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्या लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केले, ज्या लाडक्या शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केले, त्या सर्वांचे आम्ही आभार मानत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला जो आशीर्वाद दिला, त्यांचे देखील फडणवीस यांनी आभार मानले. फेक नरेटीव्हच्या माध्यमातून त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. तो प्रयत्न राज्यातील शेतकऱ्यांनी धुडकावून लावला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदींचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला ‘एक है तो सेफ है’ हा संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला. त्यामुळे सर्वच समाजातील लोकांनी हा संदेश समजून घेतला. जाती-जातीमध्ये विभागले गेलो तर नुकसान झाले असते. त्यामुळे आपल्याला एकत्रच व्हावे लागेल. हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यामुळेच सर्व समाज एकवटून आपला विजय झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. महायुतीचा विजय हा ‘है तो सेफ है’ या मोदीजींच्या संदेशाची कमाल असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. या ठिकाणी ज्या प्रकारे तृष्टीकरण करण्याचा प्रयत्न चालू होता. एक वेगळ्या पद्धतीने एका विशिष्ट समाजाला एकत्रित करून त्या माध्यमातून निवडणुका जिंकू असा दावा केला जात होता. त्या विरोधात महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Share

-