संविधानाने दिली सर्वांना समान संधी:संत मुक्ताबाई महाविद्यालयात प्राचार्य आय.डी.पाटील यांनी साधला संवाद

मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग, रासेयो व राज्यशास्त्र विभागाने संविधान दिन साजरा केला. संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. नंतर प्राचार्य डॉ.आय.डी.पाटील यांनी, संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. शासनाचे विविध कर्तव्य, जनतेला मिळालेले मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वे यांच्या माध्यमातून भारताला जगातील सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे. सर्व नागरिकांना लोकशाहीचे भान प्राप्त करून देण्याचे काम आपल्या देशाची राज्यघटना करते. भारतात विविध भाषा, जाती-धर्म अस्तित्वात असूनही एकात्मता आणि अखंडता कायम ठेवण्याचे काम संविधान करते. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधूता या जीवनमूल्यांची देणगी संविधानाने भारतीयांना दिली आहे, असे सांगितले. प्रास्ताविक प्रा.डॉ.रमेश शेवाळे यांनी केले. प्रा.डॉ.संदीप माळी, डॉ.कृष्णा पाटील, डॉ.विजेंद्र जाधव, डॉ.अजित कुलकर्णी, डॉ.पंचशिला वाघमारे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Share