संपूर्ण राज्यात उत्साहात होलिका दहन संपन्न:अनेक गावांमध्ये एक गाव एक होळी, अनेक ठिकाणी सार्वजनिक मैदानांवर होलिका दहन

राज्यात आज होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी होलीका दहन करुन मोठा जल्लोष करण्यात आला. होळी भोवताली तरुणांनी, बालगोपाळांनी बोंबा मारत मोठ्या आनंद उत्साहात होळी पेटवली. होळीच्या अग्नीत निराशा, आळस, दारिद्रयाची आहुती देऊन सर्वत्र सुख शांती, निरामय आरोग्याची मंगल कामना करण्यात आली. घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होलिका दहन करण्यात आले. विविध ठिकाणी तसेच घरोघरी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. अनेक गावांमध्ये एक गाव एक होळी साजरी करण्यात आली. राज्यभरातील प्रमुख शहरांत होलिका दहनाच्या सोहळ्यांचा जल्लोष मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक यांसह इतर ठिकाणी होलिका दहन उत्साहात पार पडले. अनेक शहरांमध्ये सार्वजनिक मैदानांवर होलिका दहनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले होते. होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे. दृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल विचारांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश आहे. होळी का साजरी केली जाते याबद्दल अनेक कथा आहेत. यापैकी प्रल्हाद आणि होलिकाची कथा सर्वात लोकप्रिय आहे. याशिवाय, हा सण नवीन कापणीचे आगमन आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीचा आनंद साजरा करण्यासाठी देखील साजरा केला जातो. शेगाव येथील गजानन महाराज मंदिरातही आज होळीचे दहन करण्यात आले. होलिका दहनापूर्वी गजानन महाराजांची पालखी काढण्यात आली होती. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

Share

-