पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीत रस्सीखेच:अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये सुप्त संघर्ष, दोन दादांपैकी कोण मारणार बाजी?

पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. पुण्याचे पालकमंत्रिपदासाठी दोन्ही नेते आग्रही असल्याने महायुतीमध्ये मंत्रिपदावरून मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद होते. आताच्या सरकारमध्ये देखील त्यांनाच मिळणार की भाजप चंद्रकांत पाटलांना पुण्याचे पालकमंत्री करणार याकडे सध्या लक्ष लागले आहे. 2019 मध्ये अजित पवार महाविकास आघाडीमध्ये होते. त्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री देखील होते आणि पुण्याचे पालकमंत्री देखील होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि महायुतीचे सरकार आले. यामुळे अजित पवारांकडे असलेले पुण्याचे पालकमंत्रिपद देखील गेले. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील बनले. त्यानंतर अजित पवारांनी देखील बंड करत पक्ष आपल्या नावावर करत महायुतीमध्ये सामील झाले. अजित पवार महायुतीमध्ये आल्यावर त्यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह केला आणि त्यांना पालकमंत्रिपद देण्यात आले. चंद्रकांत पाटलांना सोलापूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले. जेव्हा चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री होते तेव्हा देखील अजित पवारांनी जिल्ह्याच्या प्रशासनावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अजित पवार मूळ पुण्याचेच असल्याने त्यांचा पुण्यातील प्रशासनावर पूर्वीपासूनच दबदबा राहिला आहे. अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, पुण्यातील राजकारण हे प्रामुख्याने सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांचे साखर कारखाने तसेच सहकारी संस्था आहेत. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री होणे हे अजित पवारांसाठी महत्त्वाचे आहे. अजित पवार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदारांना निधी देखील उपलब्ध करून देतात. मात्र, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे पुण्याचे पालकमंत्रिपद कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Share

-