नवे सरकार धोरणात्मक निर्णय घेणार- CM फडणवीस:म्हणाले- दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न, लाडकी बहीणचे 2100 रुपये करणार
महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर 13 दिवसांनी नवीन सरकार लाभले. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून ते राज्याचे 21 मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री होणारे शिंदे हे दुसरे नेते आहेत. शपथविधीनंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचा कारभार योग्य प्रकारे चालला आहे की नाही, हे सांगण्याचे काम पत्रकार करतात. तसेच ज्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवायच्या असतात त्या तुम्ही पोहोचवतात. गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवले. सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहील महाराष्ट्र आता थांबणार नाही, गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे आणि त्या गतीनेच महाराष्ट्र पुढे जाईल. सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहील असा मी विश्वास व्यक्त करत आहे. रोल जरी आता बदलले असले तरी समन्वय तोच राहणार आहे. आता आमची पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली, तेव्हा आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आता टेस्ट मॅच आहे त्यामुळे योग्य निर्णय घेत राज्याला पुढे न्यायचे आहेत. नदी जोड प्रकल्प असेल किंवा सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत. आमचा प्रयत्न हा असणार आहे की आमच्या वचननाम्यात जी काही वचन आम्ही दिली आहेत ते सर्व आम्ही पूर्ण करणार. आमचे सरकार हे सर्वांना सोबत घेऊन जाणार महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो आमचे सरकार हे सर्वांना सोबत घेऊन जाणार आहोत. संकटे अनेक येत असतात मात्र त्या संकटातून वाट काढत आपण प्रगती करणार आहोत आणि जनतेला आश्वासित करतो की पारदर्शीपणे हे सरकार काम करेल. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, विरोधकांची संख्या कमी आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या संख्येनुसार आम्ही त्यांचा सन्मान करणार नाही असे नाही. आम्ही त्यांच्या संख्येवर नाही तर त्यांच्या मुद्याचा सन्मान करू. निकषात असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही या सगळ्या योजना सुरू ठेवणार आहोतच. हे सगळे आता बजेटमध्ये ठरवले जाणार आहे. निकषाच्या बाहेर जे काही असेल त्याचा आम्ही तपास करू. जे काही निकषात असतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार. त्यात जर सगळे बसत असतील तर यावर सरसकट विचार करण्याची गरज नाही. तसेच लाडकी बहीण सुरू राहणार आणि 2100 रुपये करणार असल्याचे देखील यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करू विधीमंडळाचे विशेष अधिवेशन 7, 8 आणि 9 डिसेंबर बोलावणार आहे. त्याचदरम्यान 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करणार आहोत. त्यासाठी राज्यपालांकडे शिफारस पाठवली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 2026 पर्यंत 16 हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करणार नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू झाले पाहिजे. सौर ऊर्जेचे प्रकल्प यावर माझा भर असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत 2026 पर्यंत 16 हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. शाश्वत विकासाची हातात घेतलेली कामे पूर्ण करायची आहे. यामुळे शेतकरी आणि राज्याचे कल्याण होणार आहे. या कामांचे टेंडर देऊन काही होत नाही. त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो. काही अडथळे येतात, ते दूर करावे लागतात. मागील काळातील वॉर रुमची पद्धत अधिक प्रभावी कशी करता येईल, यावर भर राहणार आहे. जलयुक्त शिवार सारख्या योजनेला मागील अडीच वर्षांत बळकटीरण केलेले आहे. या योजनेला अधिक वेगाने कसे करता येईल, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. जमिनी बळकाऊन विकास करण्याची मानसिकता नाही शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे. सगळे शेतकरी भूसंपादन करण्यासाठी सांगतात. सांगली जिल्ह्यातील काही भागात त्याला समर्थन आहे. पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो, तिथे मात्र, मोठ्या प्रमाणात विरोधात आहे. आम्ही समृद्धी महामार्ग लोकांचा विरोध पत्कारून केला नाही. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला ज्या भागापर्यंत विरोध नाही, तिथपर्यंतची अलायमेंट फायनल करायची आणि पुढची अलायमेंट सगळ्यांशी चर्चा काही पर्याय काढता येतो का, याचा विचार करू. कारण शेतकऱ्यांना नाराज करून, त्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची आमची मानसिकता नाही.