सत्ताधारी आमदाराकडून घरचा आहेर:अवैध रेती वाहतुकीत कोतवालापासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत ‘देणे-घेणे’, जयंत पाटलांनी वाचून दाखवले पत्र

“वाळूचे कण रगडिता तेलही गळे…” या समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रयत्नवादाचे महत्त्व विशद करणाऱ्या ओळींचा अर्थच बदलवण्याचा चंग जिल्हातील रेती तस्करांनी बांधला असून यांच्यापुढे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हतबल झाल्याचे सांगत मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्रात अवैधरित्या सुरु असलेले रेती, मॅगनीज व गौण खनिज वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी, असे पत्र या क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी तहसीलदार यांना पाठवले आहे. या पत्रात “रेती घाट चालवतांनी कोतवालापासून ते जिल्हाधिकारी, महसुल मंत्री व खनिकर्म मंत्री यांच्यापर्यंत तसेच पोलीस शिपाई पासून ते पोलीस अधिक्षक, मंत्र्यापर्यंत सर्वांना ‘देणे-घेणे’ करण्यात येते. त्यामुळे कुणीच आमचा बाल-बाक करु शकत नाही….” असा घणाघाती आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने केल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आ. जयंत पाटील यांनी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार राजू कारेमोरे यांचे पत्र वाचून दाखवत हे आरोप गंभीर असल्याचे लक्षात आणून दिले. आमदार कारेमोरे यांनी तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मोहाडी तालुक्यातील बेटाळा, निलज, कान्हळगाव, मुंढरी, मोहगाव देवी, पांजरा, रोहा या काही घाटावर रेती डेपो आहेत व काही घाटावर डेपो नाहीत. ज्या कोणी ठेकेदारांनी सदर डेपो किंवा घाट घेतलेले आहेत, ते फक्त नाममात्र आहेत. सदर संपूर्ण घाट व डेपो वैध पध्दतीने किंवा नियमानुसार न चालवता अवैद्य पध्दतीने व नियम धाब्यावर बसवून चालवत आहेत. हे संपूर्ण घाट खनीज अधिकारी, कर्मचारी, आपण व आपले चेले-चपाटे चालवित आहेत. ही सगळी खटाटोप अर्थकारणातून केली जात आहे. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी यांनी प्रयत्नवादाचे महत्त्व विशद करताना सकारात्मक दृष्टिकोनातून दिलेला “प्रयत्न वाळूचे कण रगडिता, तेलही गळे” उपदेशात बदल करण्याचे काम रेती तस्करांनी सुरु केले आहे. त्यातूनच ” प्रयत्न वाळूचे कण रगडिता,पैसाच गळे…” असे म्हणण्याची वेळ आली आहे. असा आरोप करत आमदार कारेमोरे यांनी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले आहे. भंडारा जिल्ह्याला बिहार होवू नये म्हणजे झाले? पत्रात पुढे लिहिले आहे की, काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेवून मोठ्या प्रमाणात हे काळे काम चालत आहेत. त्यामुळे विधान सभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे. रेती, मॅगनीज गौण खनिज चोरी चे प्रमाण वाढलेले आहेत. आपल्याकडून शासनाच्या जीआर यादी मागणी केली तरी सुध्दा आपण मला कुठल्याच प्रकारच्या जीआर किंवा यादी, घाटाबददल कुठलीच माहिती दिली नाही व जन प्रतिनिधींच्या आदेशाची अवहेलना करण्यात आली. शासनाचे सध्याचे वाळू धोरणाचे व डेपो चालविण्याबददल जे काही जीआर निघाले आहेत त्यांची संपुर्ण माहिती माझ्या कार्यालयाला दयावी अशी मागणी या पत्रातून कारेमोरे यांनी केली आहे. जर तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्र किंवा संपूर्ण भंडारा जिल्हयाला बिहार बनवायचे नसेल तर आपण वरील गैरप्रकार त्वरीत थांबवावे, भविष्यात एखादी अप्रिय घटना घडली तर तहसीलदार सर्वस्वी जबाबदारी राहील अशी मागणी या पत्रातून आमदार कारेमोरे यांनी आहे. या पत्राचे वाचन जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्यामुळे याचे काय पडसाद उमटणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Share

-