ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने EVM हटाव मोहीमेची सुरुवात:राज्यभर स्वाक्षरी मोहिमेद्वारे जनआंदोलन उभारण्याचा प्रयत्न

वंचित बहुजन आघाडीच्या EVM विरोधात स्वाक्षरी मोहीमेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वाक्षरी करत सुरुवात केली. त्यांनतर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात EVM विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. EVM च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. EVM च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. एकही आमदार नाही मात्र, युतीला फायदा विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एकाही जागेवर यश मिळाले नाही. मात्र, वंचितमुळे महायुतीचा एक-दोन नव्हे, तर तब्बल 20 जागांवर फायदा झाल्याचे समोर आले आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 आणि काँग्रेसचे 6 उमेदवार पडलेत. विधानसभेत आलेल्या भाजपच्या आणि लाडक्या बहिणीच्या लाटेत मुस्लीम मतदार वंचितच्या पाठीमागे मोठ्या संख्येने उभा राहिल्याचे दिसून आले. याचा फटका मात्र महाविकास आघाडीला बसल्याचे दिसले.

Share

-