लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात का नाही?:विजय वडेट्टीवार यांचा विधानसभेत सवाल

लडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुतीने आपल्या जाहीरनाम्यातून दिले होते. या माध्यमातून महायुतीला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. मात्र राज्याच्या पहिल्याच अधिवेशनात राज्यपाल यांच्या अभिभाषनात लाडक्या बहिणी योजनेत महिलांना 2100 रुपये देण्याचा उल्लेख का नाही? असा प्रश्न काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषनावर झालेल्या चर्चेत विजय वडेट्टीवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर टीका केली. या भाषणात लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचा निर्णयाचा उल्लेख का नाही? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राज्यपालांच्या अभिभाषनात ज्या गोष्टींचा उल्लेख अपेक्षित होता, त्याचा उल्लेख दिसला नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. हे खेदाने बोलावे लागत असल्याचे देखील ते म्हणाले. राज्यात मोठ्या प्रमाणात तरुणी गायब होत असल्याचा उल्लेख देखील वडेट्टीवार यांनी केला आहे. महागाई दर आणि महागलेल्या वस्तूंचा देखील वडेट्टीवार यांनी उल्लेख केला. महिलांच्या संरक्षणाच्या संदर्भात राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख झाला असता तर महिलांच्या प्रति सरकारने काही योजना केल्याचा आनंद घेता आला असता, असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्थेवर प्रश्चचिन्ह महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरची इकॉनोमी महाराष्ट्राला करणार असल्याचा उल्लेख राज्यपाल महोदयांनी आपल्या अभिभाषणात केला. मात्र हा उल्लेख करत असताना या राज्यावर असलेले एकूण कर्जाचा उल्लेख आणि या राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती यावर देखील त्यांनी प्रकाश टाकण्याची आवश्यकता होती. असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थिती संदर्भात जे सामोरे येत आहेत ते राज्य दिवाळखोरीत मार्गावर आहे का? असा प्रश्न पडतो, असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Share

-