हिंदुत्व सोडल्यावर काय होते हे त्यांना समजले:कॉंग्रेससोबत जाऊन त्यांचे अध:पतन झाले, दानवेंच्या विधानावर गुलाबराव-दरेकरांची टोलेबाजी

हिंदुत्व सोडल्यावर काय होते हे दानवेंना समजले, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर दिली आहे. तसेच देर आये दुरुस्त आये, असाही टोला गुलाबराव पाटील यांनी दानवे यांना लगावला आहे. याच सोबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील यात उडी घेत दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ज्या दिवशी मी कॉंग्रेससोबत युती करेल त्या दिवशी मी माझे दुकान बंद करेल. पण आता लेट आले दुरुस्त आले असे म्हणावे लागेल. हे त्यांच्याही लक्षात आले आहे की ज्या दिवशी आपण हिंदुत्व, देश, धर्म आणि राज्य सोडतो त्यावेळेस काय चित्र होते हे दानवेंच्या लक्षात आले आहे. आणि मला तरी असे वाटते की शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडलेल्या माणसाला आज पश्चाताप होतोय, परमेश्वर त्यांचे भले करो, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर अंबादास दानवे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, त्यांच्या पक्षाने काय करावे हे त्यांनी ठरवावे. कधीकाळी या महाराष्ट्राची शान शिवसेना होती. त्या शिवसेनेत आता जानच राहिलेली नाही. त्यामुळे स्वबळावर किती जान राहील हा देखील संशोधनाचा विषय आहे. पण कॉंग्रेससोबत जाऊन त्यांचे अध:पतन झाले आहे. आता शेवटी कोणासोबत जायचे की स्वतंत्र लढायचे हा शेवटी त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. ते त्यांचा योग्य तो निर्णय घेऊ शकतात, असे दरेकर म्हणाले आहेत. काय म्हणाले होते अंबादास दानवे?
अंबादास दानवे म्हणाले, लोकसभेनंतर काँग्रेसचे नेते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते. त्यामुळे जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे नुकसान झाले. ते मंत्रिपदाचा विचार करायला लागले होते. निवडणुकीआधी काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी तयारी करत होते. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदासाठी नाव ठेवले असते तर पाच टक्के मतदान महाविकास आघाडीचे वाढले असते. अनेक जागा कॉंग्रेसने लोकसभा निकाल आणि सर्वेचा दाखला देत शिवसेनेला दिल्या नाहीत, स्वतःकडे ठेवल्या. पुढे दानवे म्हणाले, 95 जागा आम्ही लढलो 20 जागा जिंकलो, महाराष्ट्रभर शिवसेना पक्ष आहे. 288 जागा लढलो असतो तर 40-50 जागा तरी जिंकलो असतो असे पक्षातील उमेदवारांचे म्हणणे होते. पण महाविकास आघाडीसोबत आम्ही आहोत. वेगळा कुठलाही निर्णय झाला नाही. महाविकास आघाडीमध्ये राहून कमी झाले नाही. काही न काहीतरी फायदा झाला, असेही दानवे म्हणाले. कधी ना कधी स्वबळावर आमच्या पक्षाला सत्ता आणायची आहे. पण त्यासाठी ताकद वाढवायला पाहिजे, असे सूचक विधान देखील अंबादास दानवे यांनी केले.

Share

-