कोशिश करने वालों की हार नहीं होती:आम्हाला सहानुभूती नको, संधी द्या; जागतिक दिव्यांग दिनी अनाम प्रेमची सदाबहार गोष्ट!

”लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती” या ओळी अनाम प्रेमच्या विद्यार्थ्यांना समर्पकपणे लागू होतात. चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर ही मुलं सामान्यांप्रमाणे जगण्याचे स्वप्न पाहतात. आणि ती स्वप्न फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत नाहीत तर ती पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते कष्ट उपसण्याचीही त्यांची तयारी आहे. आम्हाला सहानुभूती नको तर संधी द्या; जागतिक दिव्यांग दिनी अनाम प्रेमची ही सदाबहार गोष्ट…! आम्हाला सहानुभूती नको, दया नको, संधी हवी आहे. स्वतःला घडवण्याची. आमच्यात जे काही व्यंग आहे , त्यामुळे आम्ही कोणापेक्षा कमी आहोत असे अजिबात नाही. आमच्यातही बुद्धिमत्ता आहे, जिद्द आहे आणि याहीपेक्षा जास्त मेहनत घेण्याची तयारी आहे. सामान्य माणसांप्रमाणे सुखी, समाधानी, यशस्वी आयुष्य जगण्याचं स्वप्न आहे. यात समाजाची भक्कम साथ असली, तर नक्कीच आमचं हे स्वप्न साकार होईल. अनाम प्रेम या संस्थेची दिव्यांग मुले बोलत होती. दिव्यांगांसाठी आशेचा किरण, दिव्यांगाना नवदृष्टी देणारे घर, दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या स्वावलंबनाचा मार्ग सुकर करणारी संस्था म्हणजे अनाम प्रेम… दिव्यांग व्यक्तींच्या समस्या समजावून घेता याव्या, दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी समाजात जनजागृती व्हावी यासाठी 3 डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर दिव्य मराठी डिजिटलने अनाम प्रेम संस्थेला भेट देत त्यांच्या कार्याची माहिती घेतली. यावेळी दिव्यांग मुलांनी मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. अहिल्यानगर येथील 35 वर्षे जुनी नामांकित सेवाभावी संस्था स्नेहालय म्हणजेच डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वात सुरू झालेली संस्था ही अनाम प्रेमची मातृ संस्था. दूरदृष्टीने विचार करून अंध, अपंग, मूकबधिर, अस्थिव्यंग क्षेत्रापुढील आव्हाने, गरजा, दिव्यांग व्यक्तींना मिळणारी दुर्लक्षित वागणूक पाहून स्नेहालयने यासाठीचा स्वतंत्र विभाग असावा, या दृष्टीने 2005 साली अनाम प्रेमची स्थापना केली. तेव्हाच्या अहमदनगर व आत्ताच्या अहिल्यानगर येथील गांधी मैदानातील एका छोट्याशा खोलीत या कार्याची सुरुवात झाली. आज त्याठिकाण भव्य अशी चार मजली इमारत उभी आहे. संभाजीनगरमध्ये अशी झाली सुरुवात 2023 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्येही अनाम प्रेमची शाखा सुरू झाली. आज याठिकाणी 12 मुलं शिक्षण घेत आहेत. मराठवाड्याच्या विविध भागातून तळागाळातील कुटुंबातून आलेली ही मुले आज अनामप्रेममध्ये राहत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत आहेत. शहरातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकणाऱ्या या दिव्यांग मुलांची सर्व व्यवस्था अनाम प्रेममध्ये मोफत आहे. त्यामुळे परिस्थितीअभावी शिकू न शकणारी मुलेही आज याठिकाणी आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ समाज सहयोगावर, कुठल्याही प्रकारच्या सरकारी अनुदानाशिवाय, मदतीशिवाय अनाम प्रेमचा गाडा अविरतपणे सुरू आहे. नि:शुल्क निवासी व्यवस्था अनाम प्रेमच्या संभाजीनगर येथील शाखेचे प्रमुख जे. आर. मंत्री यांनी अनाम प्रेमच्या शहरातील सुरुवातीविषयी सांगितले. ते म्हणाले, दिव्यांगांना स्वालंबी बनवणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून छत्रपती संभाजीनगरमध्ये अनाम प्रेम या संस्थेची शाखा सुरू झाली. कोणतेही सरकारी अनुदान नसतांना केवळ लोकांचे प्रेम व दात्यांचे प्रोत्साहन या मदतीवर ‘अनाम प्रेम’ने चाटचाल सुरू केली. मराठवाड्यातील दिव्यांग मुलांना शिक्षण घेतांना हामखास अडचण येते. राहण्याची व्यवस्था नसते. जी व्यवस्था ती मुले निभावून घेण्याचा प्रयत्न करतात ती अत्यंत गैरसोयीची असते. घरची परिस्थिती, पालकांमध्ये माहितीचा अभाव अशा अडचणी दिव्यांग मुलांच्या स्वावलंबनात बाधा ठरतात. त्यामुळे शहराच्या ठिकाणी या मुलांसाठी नि:शुल्क निवासी व्यवस्था, भोजन व्यवस्था, वैद्यकीय देखभाल आवश्यक आहे. त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले तर त्यांना ही उत्तम करिअर करता येईल. ही गरज ओळखून संस्थेने वाटचाल सुरू केली. समान वागणुकीची अपेक्षा अनाम प्रेमच्या मुलांशी दिव्य मराठीने विशेष संवाद साधला. यावेळी या विद्यार्थ्यांनी समान वागणुकीची अपेक्षा व्यक्त केली. ज्ञानेश्वर काकडे म्हणाला, आमच्यासारख्या लोकांना समाज स्वीकारत नाही. सहानुभुतीच्या नजरेने बघतो. जेव्हा कधी आम्ही रस्त्यावर असतो त्यावेळी आम्हाला रस्ता ओलांडताना तुमच्या मदतीची आवश्यकता असते. पण लोक हातावर 5-10 रुपये ठेवून निघून जातात. अशावेळी वाईट वाटते. आम्हाला वेगळ समजू नका. आम्हाला पैशांच्या मदतीची गरज नसून तुमच्या 2 शब्दांची, मैत्रीची गरज आहे. आमच्या काही बांधवांची फसवणूकही होते. 100 ची नोट दिल्यावर सुट्टे पैसे अनेकदा परत मिळत नाही. असा अनुभव यावेळी ज्ञानेश्वरने सांगितला. योजना फक्त कागदावरच साईनाथ मतकर म्हणाला, आम्हाला कोणाकडून दया नको, तर संधी हवी आहे. आम्हाला आमच्या मेहनतीचे फळ मिळावे. शासन सगळ्याच दिव्यांगांना नोकऱ्या देऊ शकत नाही. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात ज्या कंपन्या आहेत, त्यांनी दिव्यांगांना रोजगार द्यावा. फक्त दिव्यांग दिन साजरा करून काही होणार नाही. दरवर्षी 1 हजार दिव्यागांना तरी नोकऱ्या मिळाव्या. समाजकल्याण विभाग, सामाजिक न्याय विभागाच्या योजना तर कागदावरच आहेत. त्यांची उदासिनता कायम दिसून येते. दिव्यांगत्व आमची चूक नाही ज्ञानेश्वर लांडगे म्हणाला, मी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी आलो. मात्र 12 वी विज्ञान शाखेत शिकत असतानाच माझ्या डोळ्यांची 60 टक्के दृष्टी गेली. त्यानंतर मला विज्ञान शाखेत शिकता आले नाही. कला शाखेतून पुढे शिकण्याचा निर्णय घेतला. नोकरीसाठी प्रयत्न करताना थोडे वाईट अनुभव येतात. अनेक ठिकाणी लोकांना वाटते की, आम्ही हे काम करू शकणार नाही आम्ही ते काम करू शकणार नाही. कम्प्युटर चालवू शकणार नाही. असे अनेक गैरसमज असतात. पण आम्ही देखील कौशल्यपूर्ण कामे करू शकतो. फक्त गरज आहे ती संधी मिळण्याची. दिव्यांगत्व ही आमची चूक नाही. समाजाने दृष्टीकोन बदलावा. जी गोष्ट ते करू शकतात ती आम्हीही करू शकतो. कारण शिक्षण कोणात भेद करत नाही. शिक्षणामुळे दिव्यांग व्यक्तीही ज्ञानाची प्राप्ती करू शकते. रायटर मिळण्यात अडचण येते प्रल्हाद पांडव म्हणाला, गेली 12 वर्षे मी अनाम प्रेमसोबत आहे. दिव्यांग म्हणून येणारी महत्त्वाची अडचण म्हणजे रायटरची. शिक्षण घेत असताना कुठल्याही परिक्षा देताना रायटरची समस्या जाणवते. सहजासहजी रायटर उपलब्ध होत नाही. अंध असल्यामुळे ब्रेन लिपीची वापर आम्ही करतो. मात्र, त्यालाही मर्यादा आहेत. शासनानेही या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा. आमच्या एका अंध मित्राचा मोबाइल बसस्थानकावर एकाने फोन करण्यासाठी घेतला. मात्र, फोनवर बोलत बोलत तो व्यक्ती निघून गेला आणि आमचा मित्र काहीच करू शकला नाही. अशाप्रकारे लोक फसवणूकही करतात. असे वेगवेगळे अनुभव येत असतात. अनाम प्रेममुळे मला खूप मदत झाली आहे. माझी आई, भाऊ, बहिण तिघेही अंध आहेत. संस्थेमुळे आमचे डोळ्यांचे ऑपरेशन झाले. संस्थतले सगळेच खूप जीव लावतात. आम्हाला प्रोत्साहनाची गरज अंध शिक्षक रामू बांडे बुचे म्हणाले, दृष्टीवान समाजात जगत असताना दृष्टीहिन मुलं हे दृष्टीहिन दाम्प्त्याच्या पोटी येते. दृष्टीहिन जन्मणे ही काही त्या मुलाची चूक नसते. समाजाने त्यांना दूर सारायला नको. समाजात बाहेर फिरताना अशा व्यक्तींना मदतीची गरज असते. रस्ता कसा ओलांडावा इथपासून त्यांना मदतीची गरज असते. दिव्यांग जर एखादा व्यवसाय करत असेल तर त्यांना प्रोत्साहनाची गरज असते. समाजात जागरुकता निर्माण करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. दात्यांच्या मदतीवर गाडा सुरू जे. आर. मंत्री यावेळी म्हणाले, अनाम प्रेम संभाजीनगरमध्ये नवीन आहे. आम्हाला तुमच्या मदतीची, पाठिंब्याची गरज आहे. सध्या भाड्याच्या जागेत अनामप्रेमची वाटचाल सुरू आहे. आमच्याकडे दिव्यांग मुलींच्या राहण्याबाबतही विचारणा केली जाते. मात्र, जागेच्या अभावी तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तवही अजून त्यांच्या राहण्याची सोय करू शकलो नाही. मात्र, भविष्यात याबाबत विचार सुरू आहे. सरकारी मदतीशिवाय दात्यांच्या मदतीवर हा गाडा सुरू आहे. अनाम प्रेम दिव्यांगांसाठी एक आशाकिरण आहे. मुले याठिकाणी राहून आपले शिक्षण पूर्ण करतात. 14 वर्षांवरील दिव्यांग मुलांना अनाम प्रेममध्ये प्रवेश दिला जातो. जून 2025 पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश संख्या वाढेल व सध्याच्या भाडे तत्वावरील जागेचा विचार करता विद्यार्थी संख्या 20-25 पर्यंत पोहचू शकेल, असे मंत्री यांनी यावेळी सांगितले. तसेच मुलांच्या कौशल्य विकासासाठी वेगवेगळे उपक्रमही याठिकाणी राबवले जात असल्याचे ते म्हणालेत. दिव्यांग दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असला तरी खऱ्या अर्थाने प्रत्येक दिव्यांगाला जेव्हा त्याचा हक्क मिळेल, समाजात प्रेमाची वागणूक, आदर मिळेल तेव्हाच दिव्यांग दिन साजरा करण्याला अर्थ उरेल. हेलन केलर, लुईस ब्रेल, स्टिफन हॉकिंग अशा अनेक महान व्यक्तींसह अनेक सामान्यही आपल्या दिव्यांगांवर मात करत पॅरालिम्पिक व इतर क्षेत्रांतही आपला ठसा उमटवत आहेत. गरज आहे फक्त प्रोत्साहनाची!

Share

-