त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमातून प्राजक्ता माळीची माघार:प्रशासनावर ताण नको म्हणून घेतला निर्णय, पण सहकलाकार करणार सादरीकरण

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त आज प्राजक्ता माळीचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. परंतु, आता या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय प्राजक्ता माळीने घेतला आहे. कार्यक्रमाला विरोध होत असल्याने अनावश्यक प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे प्रशासनावर ताण नको म्हणून आपण हा निर्णय घेतल्याने प्राजक्ताने सांगितले. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे प्राजक्ता माळी ऐवजी तिच्या इतर सहकारी कलाकारांकडून हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला होता. यासंदर्भात त्यांनी देवस्थानला पत्र लिहून चुकीचा पायंडा न पाडण्याचे आवाहन केले होते. त्यावर प्राजक्ता माळीने काल एका व्हिडिओद्वारे देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नाही. सगळे भक्त असतात. त्यामुळे समाजाची दिशाभूल करु नये, असे म्हणज उत्तर दिले होते. प्राजक्ता माळीच्या या व्हिडिओनंतर त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रम होणार असल्याचे देवस्थानचे विश्वस्त मनोज थेट यांनी सांगितले होते. मात्र, प्राजक्ताने आज इन्स्टाग्रामवर रील शेअर करत आपण कार्यक्रमाला येणार नसल्याचे म्हटले आहे. नेमकी काय म्हणाली प्राजक्ता माळी?
मला पहिल्यापासूनच या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नव्हती. कारण मंदिराच्या प्रांगणात किती गर्दी होईल आणि किती जण हा कार्यक्रम पाहू शकतील, असे सगळे प्रश्न होते. त्यामुळे मी सोशल मीडियावरदेखील या कार्यक्रमाची अजिबात माहिती दिली नव्हती, असे प्राजक्ता म्हणाली. परंतु काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती आणि काळजी प्रशासनाच्या मनात आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबीयांशी बोलून हा निर्णय घेत असल्याचे तिने सांगितले. कमिटमेंट असल्याने हा कार्यक्रम होईल, पण माझ्याऐवजी माझे सहकलाकार परफॉर्म करतील. वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये ही बाब मला जास्त महत्त्वाची आणि मोठी वाटते. त्यामुळे सर्वस्वी हा माझा निर्णय असल्याचे प्राजक्ता म्हणाली. नेमके प्रकरण काय?
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार येथे शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार होते. पण या कार्यक्रमाला देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला होता. यासंबंधी त्यांनी मंदिर प्रशासनाला पत्र लिहून असा चुकीचा पायंडा न पाडण्याचे आवाहन केले आहे. महाशिवरात्रीचा दिवस अतिशय पवित्र दिवस आहे. त्यामुळे मंदिर परिसरात केवळ धार्मिक कार्यक्रमच झाले पाहिजेत. प्राजक्ता माळी शिवस्तुती सादर करणार असतील, तरी त्यावर फेरविचार झाला पाहिजे. कारण मी स्वतः या मंदिराची माजी विश्वस्त आहे. शास्त्रीय नृत्य, कथ्थक नृत्य ठेवले पाहिजे. पण सेलिब्रिटिंना आणून येथे एक वेगळाच पायंडा पाडण्याचा प्रयत्न त्र्यंबकेश्वर देवस्थानने सुरू केला आहे. हे चुकीचे घडत असल्याचे माजी विश्वस्त ललिता शिंदे म्हणाल्या होत्या.