तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग:भावी पत्नीसाठी लिहून ठेवले अखेरचे शब्द, शिरीष महाराजांची आत्महत्या

शिरीष महाराज मोरे यांनी स्वतःची जीवन यात्रा संपवली आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली आहे. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज म्हणून त्यांची ओळख होती. शिरीष महाराज यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित झाला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शिरीष महाराज यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या सापडल्या आहेत. शिरीष महाराज यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. यातील पहिली चिठ्ठी त्यांनी आपले आई, वडील आणि बहिणीला लिहीली आहे. दुसरी चिठ्ठी त्यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला लिहिली, तिसरी चिठ्ठी आपल्या कुटुंबाला तर चौथ्या चिठ्ठीतून त्यांनी आपल्या मित्रांना शेवटाचा संदेश दिला आहे. या चिठ्ठ्यांमधून त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण देखील समोर आले आहे. शिरीष महाराज लिहितात, माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांना ही आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण 32 लाखांचे कर्ज आहे, त्यापैकी कार विकून 7 लाख फिटतील. वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या. अशी विनंती महाराजांनी या चिठ्ठीमधून आपल्या मित्रांना केली आहे. पुढे शिरीष महाराज यांनी त्यांच्या होणाऱ्या पत्नीला उद्देशून देखील मन हळवे करणारी एक चिठ्ठी लिहिली आहे. शिरीष महाराज यांनी लिहिले, माझी लाडकी पिनू, प्रियांका… खरं तर तुझा आता कुठं हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणी मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. माफ कर. आयुष्यात सर्वांत जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही. माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग,” असं शिरीष महाराजांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

Share

-