कोर्टाचा निकाल एका दिवसात येत नाही:अजित पवार 1000 कोटींच्या प्रश्नावर म्हणाले – मला जिथे न्याय मिळेल असे वाटले, मी तिकडे गेलो
प्राप्तिकर विभागाने अजित पवारांच्या 1 हजार कोटींच्या मालमत्तेवरील टाच उठवली आहे. विरोधकांनी या मुद्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली असताना स्वतः अजित पवारांनी लवादाचा यासंबंधीचा निर्णय एक प्रक्रिया असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही कोर्टाचा निकाल एका दिवसात येत नाही. मी एवढी वर्षे विरोधकांसोबत काम केले. मी भ्रष्टाचारी किंवा दोषी असतो तर त्यांनी माझ्यासोबत कामच केले नसते, असे ते म्हणालेत. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने अजित पवार यांच्याशी संबंधित 1 हजार कोटींच्या मालमत्तेवरील टाच उठवली आहे. अजित पवार यांनी 5 तारखेला राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी लवादाने हा निर्णय घेतला. यामुळे विरोधकांनी यावरून अजित पवार व भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी शनिवारी यासंबंधी आपली संक्षिप्त प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार पत्रकारांशी यासंबंधी हसत म्हणाले, मी एवढी वर्षे विरोधकांसोबत होतो. मी भ्रष्टाचारी किंवा दोषी असतो तर त्यांनी माझ्यासोबत कामच केल नसते. कोणत्याही कोर्टाचा निर्णय एका दिवसात येत नाही. यासंबंधी प्रोसेस सुरू होती. मला जिथे न्याय मिळेल असे वाटत होते, मी तिकडे गेलो आणि न्याय मागितला. मी विरोधकांसोबत असतो तेव्हा मी चांगलो असतो. त्यांच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. त्यांचा राजकीयदृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. विरोधकांच्या शपथविधीवरील बहिष्कारावर निशाणा अजित पवारांनी यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानसभा सदस्यत्वाच्या शपथविधीवर टाकलेल्या कथित बहिष्कारावरही टीका केली. ते म्हणाले, मी महाविकास आघाडीत काम केले आहे. मी त्यांचा कार्यकर्ता होतो. विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीत 31 जागा मिळाल्या तेव्हा त्यांच्यासाठी ईव्हीएम चांगले होते. पण विधानसभेत पराभव होताच ईव्हीएमला दोष देत बसायचे. लोकशाहीत कुणी काय बोलायचे हा प्रत्येकाला अधिकार आहे. पण विरोधकांना उद्या सायंकाळपर्यंत कोणत्याही स्थितीत विधानसभा सदस्यत्वाची शपथ घ्यावी लागेल. ही एक प्रक्रिया आहे. अन्यथा त्यांना परवा सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. विरोधक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण काहीतरी वेगळे करत आहोत हे दाखवण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहेत. ते स्वतःचे अस्तित्व दाखवत आहेत. पण त्याला काहीच अर्थ नाही. सुरुवातीला ते सभागृहात बसले. पण 8-10 लोकांची शपथ झाल्यानंतर ते सभागृहाबाहेर पडले. मी त्यांना कुठे चाललात असे विचारले असता त्यांनी बाहेर जात असल्याचे सांगितले. त्यानंतर मी आल्यावर मला समजले की, विरोधकांनी आज शपथ घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे, असे अजित पवार म्हणाले.