उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ येताय का?:देवेंद्र फडणवीस म्हणाले – त्यांच्याशी संबंध आहे, पण आम्ही लगेच त्यांना जवळ घेणार अशी परिस्थिती नाही
मागील अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार का? अशा चर्चा सुरू आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उद्धवजी आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे. त्याव्यतिरिक्त कधीही भेट झालेली नाही, असे सांगत आमचे संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही, पण याचा अर्थ आम्ही जवळ येतोय असाही नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि ठाकरे गटाची जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आदित्य ठाकरे हे देखील आतापर्यंत तीन वेळा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. शिवाय ठाकरे गटाच्या ‘सामना’मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत येणार अशी चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रश्नावर स्पष्टीकरण दिले आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
उद्धवजी आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे. त्याव्यतिरिक्त कधीही भेट झालेली नाही. आमच्यातले संबंध कधीही समोर भेटल्यानंतर नमस्कार करता येणार नाही असे नव्हते. आम्ही भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो. आमचे चांगले संबंध आहेत. दक्षिण भारतात जसं नेते एकमेकांचे जान के प्यासे आहेत, तशी परिस्थिती महाराष्ट्रात राहिलेली नाही. त्यामुळे संवाद साधायला, बोलायला काही हरकत नाही. संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही, पण याचा अर्थ आम्ही जवळ येतोय, आम्ही त्यांना घेणार आहोत, अशी परिस्थिती नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यादिवशी आमचे चंद्रकांत दादा उद्धव ठाकरे यांच्याशी एका लग्नात भेटले. उद्धव ठाकरे यांना सवय आहे की, भेटल्यावर काहीतरी मिश्कीलपणे बोलणार. त्यानंतर हे काहीतरी बोलले. त्यावर लगेच अशा बातम्या झाल्या की, जसं दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे आमच्यासोबत येणार आणि चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पायघड्या टाकलेल्या आहेत. असे नाही. ठीक आहे. संबंध आहे पण अशी परिस्थिती नाही पण आम्ही लगेच त्यांना जवळ घेतोय आणि सत्तेत घेतोय असे देखील नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर काय म्हणाले फडणवीस?
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या नाराजीवरही भाष्य केले. साधारणपणे एकनाथ शिंदे यांचा चेहरा हा गंभीर असतो. तुम्ही 90 टक्के बघितले तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा गंभीर असतो, असे फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही त्यांचा तसाच चेहरा गंभीर होता. आता त्यांचे तेच फोटो दाखवून शिंदे हसतच नाहीत. नाराज आहेत, असे चालले आहे, असेही ते म्हणाले. आता त्यांनी काय करावं? हा प्रश्नच आहे. प्रत्येकाची आपली कार्यपद्धती असते. प्रत्येकाची पर्सनॅलिटी असते तशी त्यांची धीरगंभीर पर्सनॅलिटी आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे नाराज नसल्याचे सांगितले.