उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांमध्ये छुपी रणनीती:लवकरच भाजपसोबत दिसल्यास संजय राऊतांना झटका बसेल, रवी राणा यांचा दावा

युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात छुपी रणनीती सुरू आहे. संजय राऊत यांना कल्पना नाही. ते आधी सुद्धा अंधारात होते आणि आता सुद्धा ते अंधारात आहेत, असा टोला रवी राणा यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारतील, असा खळबळजनक दावाही रवी राणा यांनी केला. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे गटाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यावरुनच ठाकरे भाजपच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला जातोय. आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतली होती. यावरुनच जोरदार चर्चा सुरु झाली. आता भाजच्या मित्रपक्षाने मोठा दावा केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाले रवी राणा?
उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात छुपी रणनीती सुरू आहे. पण संजय राऊत यांना त्याची कल्पना नाही. ते आधी सुद्धा अंधारात होते आणि आता सुद्धा ते अंधारात आहेत, असे रवी राणा म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील नेतृत्व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात स्वीकारणार आहेत. त्या दृष्टीने त्यांचे पाऊल टाकणे सुरु असल्याचा दावा रवी राणा यांनी केला. उद्धव ठाकरे जेव्हा भाजपसोबत दिसतील, त्यावेळी संजय राऊतांना मोठा झटका बसेल, असेही ते म्हणाले. रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
रवी राणा यांच्या दाव्यावर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. रवी राणा यांची जे पी नड्डा यांच्या जागी नेमणूक केली आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे. शिवसेनेला एक परंपरा आहे. जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा ज्या व्यक्तीचे तुम्ही नाव घेतले त्यांचा जन्मही झाला नव्हता. असे संजय राऊत म्हणाले.

Share

-