उज्ज्वल निकम हे भाजपचे सदस्य:संतोष देशमुख प्रकरणात त्यांची नियुक्ती कितपत योग्य? ते न्याय देऊ शकतील का? आव्हाडांना शंका

संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करावी, या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ कालपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. आज शासनाकडून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेत मोठी शंका उपस्थित केली आहे. उज्ज्वल निकम हे भाजपचे सदस्य आहेत. त्यामुळे ते या प्रकरणात न्याय देऊ शकतील का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल मस्साजोगच्या ग्रामस्थांसह धनंजय देशमुख आणि हे प्रकरण लावून धरणाऱ्या अंजली दमानिया यांनी स्वागत केले आहे. नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर बोलताना म्हणाले की, उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांची या प्रकरणात नियुक्ती योग्य आहे का? ते या प्रकरणात न्याय देऊ शकतील का? असा प्रश्न माझ्या मनात आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी कोण वकील असावा, हे ठरवण्यासाठी त्यांची एनओसी घेणे आवश्यक असल्याचे आव्हाड म्हणाले. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय एनओसी देत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही सरकारी वकिलाला हा खटला हाताळू देऊ नये, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. पुणे बलात्कार प्रकरणी कडक कारवाई करावी
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना पुण्यातील बलात्कार प्रकरणावरही प्रतिक्रिया देत तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांच्या मनातून पोलिसांचा धाक संपला आहे, त्यामुळे असे गुन्हे वाढत असल्याची टीका आव्हाड यांनी केली. महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असून सरकार आणि प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देखील जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मस्साजोग ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित
दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला 78 दिवस उलटूनही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन व फौजदार राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी ग्रामस्थांनी काल पासून मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर धनंजय देशमुख यांच्यासह आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्याने ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Share

-