वाल्मीक अण्णाच्या बातम्या मोबाईलवर का पाहतो?:दोघांकडून तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण, ‘संतोष देशमुख’ करण्याचीही धमकी
वाल्मीक कराडच्या बातम्या मोबाईलवर पाहिल्याने एका तरुणाला मारहाण केल्याची घटना बीडच्या धारूर येथे घडली आहे. यापुढे वाल्मीक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी देखील या तरुणाला देण्यात आली आहे. अशोक मोहिते असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप असे मारहाण करणाऱ्या आरोपींचे नावे आहेत. अशोक मोहिते हा त्याच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या व व्हिडिओ पाहत होता. यावेळी आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप तिथे आले. वाल्मीक अण्णाच्या बातम्या पाहत असल्याचे त्यांना समजल्यावर त्यांनी वाल्मीक अण्णाच्या बातम्या का पाहतोस असा जाब विचारात दोघांनी मिळून अशोक मोहिते यास शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच यापुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मीक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू, अशी धमकी देखील या आरोपींनी तरुणाला दिली. मारहाण झाल्यानंतर अशोक मोहिते जखमी झाला असून त्याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर आता उपचार सुरू असून धारूर पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बीडमध्ये अद्यापही तणाव परिस्थिती असल्याचे समोर येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बीड आणि तेथील गुन्हेगारी चव्हाट्यावर आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करत हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातीलच वातावरण ढवळून निघाले आहे. यातील आरोपी वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.