वाल्मीक कराडला रुग्णालयातून डिस्चार्ज:तीन दिवसांच्या उपचारानंतर जिल्हा कारागृहात रवानगी, पोटदुखीची केली होती तक्रार

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणीच्या आरोपात अटकेत असलेला धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. वाल्मीक कराडची बुधवारी रात्री तब्येत बिघडली होती. त्याला उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार झाल्यानंतर त्याला शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी हत्या झाली होती. या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. विशेषतः या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मीक कराड हा 15 जानेवारी पासून 22 जानेवारी पर्यंत सीआयडी कोठडीत होता. विशेष मोक्का न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. बुधवारी रात्री अचानक वाल्मीक कराडची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनंतर पुन्हा जिल्हा कारागृहात
बुधवारी रात्रीच्या सुमारास वाल्मीक कराडने पोटदुखीची तक्रार केली होती. यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुरुवातीला कारागृहात जाऊन त्याची तपासणी केली. त्यानंतर मध्यरात्री त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्याच्यावर पोटविकारासह इतर आजारांवर उपचार सुरु होते. शनिवारी रात्री शल्यचिकीत्सा विभागाच्या तज्ज्ञांची त्याची तपासणी केल्यानंतर त्याची प्रकृती सुधारल्याचा अहवाल जिल्हा कारागृह प्रशासनाला दिला. त्यानंतर शनिवारी रात्री त्याची जिल्हा रुग्णालयातून कारागृहात रवानगी करण्यात आली. वाल्मीक कराडचे सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मीक कराडला रुग्णालयात दाखल करण्यास तीव्र विरोध केला होता. वाल्मीक कराड अत्यंत ठणठणीत आहे. त्यामुळे त्याला दयामाया दाखवण्याची काहीच गरज नाही, असे त्यांनी संबंधितांना ठणकावून सांगितले होते. वाल्मीक कराड ठणठणीत आहे. खंडणी मागताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना तो अगदी ठणठणीत होता ना? मग अशांना दयामाया कशासाठी? असा सवाल करत त्याचे सगळे रिपोर्ट, ब्लड टेस्ट, CT स्कॅन आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट सार्वजनिक करा (with films)आणि त्याच्यासह सगळ्यांची रवानगी आर्थर रोडला करा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली होती. , मनोज जरांगेंचेही वाल्मीक कराडच्या तब्येतीवर प्रश्नचिन्ह
दुसरीकडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही वाल्मीक कराडच्या दुखण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या दोघांनीही वाल्मीक कराडला तुरुंगाच्या कोठडीत नव्हे तर रुग्णालयातील बेडवर राहायचे आहे, असा संताप व्यक्त केला आहे.

Share

-