वाल्मीक कराडवर आता शेतकरी संघटनाही आक्रमक:हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास दुसऱ्या बायकोची जमीन ताब्यात घेऊ, संतप्त शेतकऱ्यांचा इशारा

बीड खंडणी व संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडने हारवेस्टरसाठी शेतकऱ्यांकडून पैसे उकळले होते. त्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसत आहे. वाल्मीक कराडने शेतकऱ्यांचे पैसे परत न दिल्यास त्याच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर असलेल्या जमिनीचा ताबा घेऊ, असा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी दिला आहे. ऊसतोडणी करणाऱ्या हार्वेस्टरला अनुदान मिळवून देतो असे सांगून शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाख रुपये उकळणाऱ्या वाल्मीक कराडने पैसे परत न केल्यास त्याच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर असलेल्या बार्शी येथील जमिनीचा ताबा घेऊ, अशी आक्रमक भूमिका जनशक्ती शेतकरी संघटनेने घेतली आहे. राज्यातील जवळपास 145 शेतकऱ्यांना अनुदान देतो म्हणून प्रत्येकी आठ लाख रुपये कराडच्या माणसाकडून गोळा करण्यात आले होते. मात्र, अनुदानच न मिळाल्याने जेव्हा हे शेतकरी आपले पैसे परत मागायला गेले तेव्हा त्यांना धमकावून परत पाठवले होते. यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसांत देखील धाव घेत अर्ज दाखल केले होते. मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी संघटनेच्या नेत्याने आता वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर असलेली बार्शी येथील जमिनीचा ताबा घेणार असल्याचे सांगितले आहे. सर्व हार्वेस्टर मालकांची मीटिंग करमाळा येथे होणार असून यामध्ये पहिल्यांदा बार्शीची शेतजमीन ताब्यात घ्यायची आणि त्यानंतरही पैसे पूर्ण न झाल्यास पुण्यातील कराडची प्रॉपर्टी ताब्यात घेऊ असा इशारा अतुल खूपसे यांनी दिला आहे. वाल्मीक कराडच्या दुसऱ्या बायकोची बार्शी येथे 35 एकर जागा असल्याचे मागे उघड झाले होते. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील म्हणाले, पुढील सात दिवसाच्या आत शासनाने कराडची संपत्ती ताब्यात घेऊन हार्वेस्टर मालकांचे पैसे द्यावेत, अन्यथा बार्शी तालुक्यातील दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर असलेली शेतजमीन ताब्यात घेणार. शेतकऱ्यावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही वेळप्रसंगी पुणे आणि बीड येथील संपत्तीवर हार्वेस्टर मालकासहित ताबा घेणार असल्याचा इशाराही खूपसे पाटील यांनी दिला आहे.

Share

-