प्रचार करता करता कॉंग्रेस उमेदवार थेट भाजपच्या कार्यालयात:कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करत मारली मिठी, बंटी शेळकेंचा व्हिडिओ व्हायरल

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे बंटी शेळके यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे प्रविण दटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. या दोन्ही उमेदवारांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुर आहे. यावेळी बंटी शेळके प्रचार करत थेट भाजपच्या कार्यालयात गेल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अंगात लाल टीशर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घालून कॉंग्रेस उमेदवार बंटी शेळके प्रचार करता करता थेट प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार प्रविण दटके यांच्या कार्यालयात गेले. भाजपच्या कार्यालयात जाताना तिथे उपस्थित कार्यकर्ते यांना हस्तांदोलन केले. तसेच बंटी शेळके यांच्या वयापेक्षा मोठे असणाऱ्या उपस्थितांना वाकून नमस्कार देखील त्यांनी केला. तसेच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी बंटी शेळके यांना आलिंगन देखील दिल्याचे पाहायला मिळत आहे. बंटी शेळके यांनी जेव्हा भाजपच्या कार्यालयात प्रवेश केला तेव्हा विशेष म्हणजे कोणीही त्यांना अडवले नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हस्तांदोलन करत व मिठी मारून त्यांचे स्वागत केले. राजकारणात कटुता नसावी याची प्रचिती हा व्हिडिओ बघून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कॉंग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी हा व्हिडिओ त्यांच्या एक्सवर पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले आहे की, माझा लढा कोणत्याही व्यक्तीशी नाही, तर ती विचारांशी आहे. मध्य नागपूर असो किंवा संपूर्ण नागपूरचा नागरिक, मग तो कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असो, प्रत्येक जण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी प्रत्येक नागरिकासाठी सदैव तत्पर आहे, कायम हजर आहे आणि हाच माझा संकल्प आहे, असे बंटी शेळके यांनी लिहिले आहे.

Share

-