विष्णू चाटेच्या फोनमधून वरिष्ठांना कॉल:या प्रकरणातून कसे वाचायचे याबाबत बोलणे झाले, धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेच्या फोनचा शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. विष्णू चाटेच्या फोनवरून अनेक वरिष्ठांना फोन करण्यात आले. या प्रकरणातून कसे वाचायचे याबाबत बोलणे झाले आहे, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. धनंजय देशमुखांच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 56 दिवस उलटले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. आरोपींमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचाही समावेश आहे. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. त्यातच आता धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेच्या मोबाईलबाबत खळबळजनक दावा केला. पुराव्यांची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची धनंजय देशमुख म्हणाले, कृष्णा आंधळे फरार असताना तो पोलिसांसोबत फिरत होता. विष्णू चाटेचा मोबाईल मिळाला पाहिजे. त्यात अनेक व्हिडिओ आहेत. काही महत्त्वाचे पुरावे आहेत. या आरोपीवर केवळ पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंद करून काहीच उपयोग नाही. या आरोपींना 100 टक्के फाशी होणार आहे, पण त्या मोबाईलमध्ये जे काही पुरावे आहेत, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप, काही फोन कॉल आहेत, याची सगळी जबाबदारी ही प्रशासनाला घ्यायची आहे. यासंदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना मी काल केली आहे. चाटेच्या फोनमध्ये गंभीर गुन्ह्यांचा डाटा धनंजय देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, आरोपींना फाशी होणार आहे पण विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये जो गंभीर गुन्ह्यांचा डाटा आहे. तो आपल्याला पाहिजे. आरोपीचे त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स असणारे व्हिडिओ कॉल, फोन कॉल, ऑडिओ क्लिप आहे. यातून अनेक वरिष्ठांना कॉल करण्यात आलेले आहेत. संतोष देशमुखांचा खून करणारे हे संघटित गुन्हेगारीचे मोठे जाळे आहे. त्याचा मोबाईल समोर आणल्याशिवाय ज्या अनेक गोष्टी समोर यायच्या आहेत, त्या माहीत होणार नाहीत. संतोष देशमुख प्रकरणात नारायण गडाची एंट्री
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची बाजू घेत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर राज्यभरात बराच खल झाला. अखेर नामदेव शास्त्री यांनी देखील देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. तर आता बीडच्या राजकारणात नारायण गडाला देखील तेवढेच महत्त्व आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज हे देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मस्साजोग येथे जाणार आहेत. महंत शिवाजी महाराज हे धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि देशमुख कुटुंबातील सदस्यांची तसेच गावातील नागरिकांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता महंत शिवाजी महाराज हे काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Share

-