विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे नवे अध्यक्ष प्रा. सुभाष वारे:समतेसाठी बंधुत्वाचा ओलावा आवश्यक, सत्कार समारंभात व्यक्त केले विचार

समाजात आजही विषमता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. समतेचे वातावरण निर्माण व्हायचे असेल, तर समतेला बंधुतेचा ओलावा मिळाला पाहिजे. अंतःकरणातून प्रेमभावाने समानता आली, तर खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात उल्लेखित केलेल्या समतेचा व बंधुतेचा आदर होईल. अशी समता खऱ्या अर्थाने जैविक असते,असे मत २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. सुभाष वारे यांनी व्यक्त केले. बंधुभावाच्या भावनेतून समाजातील विषमता दूर करण्यासह संविधानाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. वारे यांचा, तर विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. भारती जाधव यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या आवारातील संविधान कट्ट्यावर झालेल्या कार्यक्रमावेळी विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, काषाय प्रकाशनचे प्रा. चंद्रकांत वानखेडे, परिषदेचे सरचिटणीस प्रा. शंकर आथरे, एस. एम. जोशी फाउंडेशनचे व्यवस्थापक राहुल भोसले, बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या व चळवळीच्या प्रवासाविषयी मनोगत मांडले. समाजात आज बंधुतेच्या मूल्याची रुजवण होणे गरजेचे असून, संविधानाला सर्वोच्च मानून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी उभारली पाहिजे. बंधुत्वाचे नाते दृढ झाले, तर समाजातील विषमता दूर होण्यास मदत होईल, असे रोकडे यांनी नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर करून समाजातील समता, बंधुभाव आणि साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे, असे ते म्हणाले.

Share

-