तू आमदार कसा होतो तेच बघतो:शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव, अजित पवारांनी दिले होते आव्हान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते अशोक पवार यांना भरसभेत चॅलेंज दिले होते. तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय? अशा शब्दांत थेट आव्हान अजित पवारांनी दिले होते. या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी अशोक पवार यांना शिरूर येथून त्यांना उमेदवारी दिली होती. या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या अशोक पवार यांच्या विरोधात शिरूर येथे अजित पवारांनी ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी दिली होती. शिरूर विधानसभा मतदारसंघातून ज्ञानेश्वर कटके यांनी 192281 एवढी मते मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच अशोक पवार यांना 117731 मते मिळाली व पराभूत झाले. त्यामुळे अजित पवारांनी दिलेले आव्हान देखील पूर्ण केले असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवारांनी काय दिले होते आव्हान?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली होती. या सभेत बोलताना शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना खुले आव्हान अजित पवारांनी दिले होते. आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय?, अशा शब्दात आव्हान केले होते. पुढे अजित पवार म्हणाले होते, दिलीप वळसेंचा शपथविधी झाला आणि अशोक पवार यांची सटकली. ते म्हणाले, दादांनी दिलीप वळसे पाटलांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होते. दादा एकटे जिल्ह्यातून गेले असते तरी आमची कामे झाली असती. त्यांच्या डाव्या आणि उजव्या हाताला कोण आमदार बसले होते. त्यांच्या कानात अशोक पवार यांनी असे सांगितले. आता अशोक पवार काय म्हणत होते ते मला त्या आमदाराने सांगितले. त्यानंतर अशोक पवार शरद पवार गटात गेले. त्यांना पवार साहेबांनी सांगितले की, पुढच्या वेळेस तुच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाले. आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय? अजित पवारांनी एकदा मनावर घेतले तर मी आमदार होऊ देत नाही. आता मी पण चॅलेंज देतो तू आमदारच कसा होतो ते बघतो. मी लोकांना सांगेन की यांची खरी औकात काय आहे, अशा शब्दात अजित पवारांनी चॅलेंज दिले होते.