युवकाला डांबून बेदम मारहाण करणाऱ्याला तत्काळ अटक करा:यशवंत सेनेची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

खामगाव भोकरदन तालुक्यात धनगर समाजाच्या युवकाला डांबून मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने ६ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद आहे की, भोकरदन तालुक्यातील मौजे आणवा येथील धनगर समाजातील कैलास बोऱ्हाडे या तरुणाला गावातील काही समाजकंटकांनी सार्वजनिक रस्त्यावर लोखंडी सळईने त्याला डाग दिले. त्याला शारीरिक त्रास दिला, ही घटना अतिशय निंदनीय आहे. जाणीवपूर्वक धनगर समाजाला त्रास देण्याचा प्रकार केल्या गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. कैलास बोऱ्हाडे यांना आणवा गावातील काही गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा सर्व समाज बांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ज्या गावगुंडांनी कैलास बोऱ्हाडे यांना मारहाण केली, त्यांवर कडक कारवाई करून ताबडतोब अटक करावी. तसेच, मंठा तालुक्यातील ठेंगे वडगाव या गावांमध्ये काही समाजकंटकांनी धनगर समाजाच्या विलास अंकुश धुमाळे याला मारहाण करून खून केला. या प्रकरणातही योग्य ती कारवाई झालेली नाही. या दोन्ही प्रकरणांवर कारवाई झाली नाही तर बुलडाणा जिल्हा यशवंत सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर अंबादास माने, गोपाल तारडे, आनंदराव नागे, रवींद्र गुरव, संतोष आटोळे, श्रीहरी डांगे, निवृत्ती नागे, गजानन दिनवाले, प्रवीण तारडे, निलेश सपकाळ यांच्यासह अनेक समाज बांधवांच्या सह्या आहेत. खामगाव तहसीलदार यांना निवेदन देताना धनगर समाज बांधव