11 वर्षीय मुलीचा ब्लेडने गळा कापून खून:तरुणाला जन्मठेप, हिंगोली न्यायालयाचा निर्णय

हिंगोली तालुक्यातील नांदूसा येथे एका ११ वर्षीय मुलीचा तिच्या घरात जाऊन ब्लेडने गळा कापून खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप व ५००० रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश आर. व्ही. लोखंडे यांनी शनिवारी ता. ७ दिला आहे. याबाबत सहाय्यक सरकारी वकिल ॲड. सविता देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदूसा येथील एक कुटुंब ता. २१ मे २०२० रोजी शेतात कामासाठी गेले होते. काडीकचरा पेटवून देण्यासाठी त्यांच्याकडे काडेपेटी नसल्याने त्यांनी गावातील बालाजी उर्फ गोपाल आडे याच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून घरी जाऊन मुलास काडेपेटी घेऊन पाठविण्याचे सांगितले. त्यानंतर मुलगा काडेपेटी घेऊन शेतात गेला. दरम्यान, काही वेळानंतर त्या कुटुंबाची ११ वर्षीय मुलगी व एक मुलगा घरी आले. यावेळी बालाजी उर्फ गोपाल याने त्या मुलास मोबाईलवर पब्जी गेम लाऊन बालाजीच्या शेतात बसविले व तो मुलीच्या घरी गेला. त्यानंतर त्याने ११ वर्षीय मुलीचा ब्लेडने गळाकापून खून केला. काही वेळानंतर त्या कुटुंबातील दुसरा मुलगा घरी आला असतांना त्याने त्याची ११ वर्षीय बहिण गळा कापलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्याने शेतात जाऊन हा प्रकार सांगितल्यानंतर सर्वच कुटुंब घरी आले. त्यांनी मुलीला पाहिले असला तिचा गळा कापलेला असल्याचे दिसून आले. यामध्ये ती मुलगी मयत झाली होती. या प्रकरणी बालाजी उर्फ गोपाल आडे याच्या विरुध्द बासंबा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस उपाधिक्षक रामेश्‍वर वैंजने यांच्या पथकाने अधिक तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. सदर प्रकरणात १७ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी बालाजी उर्फ गोपाल आडे यास जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल ॲड. सविता देशमुख यांनी काम पाहिले त्यानंतर ॲड. एस. डी. कुटे, ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ए. डी. डोईजड यांनी काम पाहिले.

Share

-