शेगाव रेल्वे स्थानकावर 9 एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी:भुसावळ मध्य रेल्वे व्यवस्थापकांना गणेश चौकसे मित्रमंडळाचे निवेदन

खामगाव मध्य रेल्वेवर शेगाव रेल्वे स्थानक असून बुलडाणा जिल्ह्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. रेल्वेची वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता शेगाव रेल्वे स्थानकावर आणखी ९ एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी गणेश चौकसे मित्र मंडळाच्या वतीने मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या प्रबंधकांना २६ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, जिल्ह्यातील सर्व व्यापारी, तरुण प्रवाशी शेगाव स्थानकावर ये-जा करतात. पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई इत्यादी ठिकाणी शिक्षण व रोजगारासाठी महानगरांमध्ये नियमित ये-जा असते. तसेच शेगाव हे श्री संत गजानन महाराजांची पावन भूमि म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून दररोज भाविक येत असतात. हे लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी शेगाव रेल्वे स्थानकावर बल्लारशाह – मुंबई,पुरी-अहमदाबाद, पुरी-शिर्डी, हैदराबाद-जयपूर, हुजूर साहेब नांदेड-श्री गंगानगर, मदुराई स्पेशल एक्सप्रेस, सिकंदराबाद-उदयपूर, महेबुबनगर-राजकोट, पुरी-साईनगर शिर्डी या एक्सप्रेस प्रवाशी गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी केली आहे. हे निवेदन मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे प्रबंधक सुनील कुमार सुमन यांना देण्यात आले. या वेळी गणेश चौकसे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश चौकसे, शरदभाऊ वसतकार, दीपक जैन, विनोद सोनोने, मेजर देवदत्त मकासरे, विशाल तायडे आदी उपस्थित होते. शेगाव रेल्वे स्थानकाला सद्यस्थितीत वार्षिक ४० कोटी रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. मागणी केलेल्या या ९ एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला तर आणखी १० कोटी रुपयांचे उत्पन्न वाढणार असल्याचा अंदाज आहे. मध्य रेल्वे प्रबंधक यांना निवेदन देताना गणेश चौकसे, शरद वसतकार.

Share

-