फडणवीस, शिंदे, पवारांची दीड तास चर्चा पण तोडगा नाही:निर्णयासाठी नेते दिल्लीला जाणार; 14 किंवा 15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार

राज्य विधानसभेचे अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर आले असले तरी अद्याप राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तसेच खातेवाटपाबाबत महायुतीमध्ये अद्याप एकमत झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात काल रात्री देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मेघदूत या बंगल्यावर दीड तास बैठक झाली. मात्र अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे युतीतील हे प्रमुख नेते आता दिल्लीत अमित शहा यांची भेट घेण्यासाठी जाऊ शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी 14 किंवा 15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. रात्री दीड तास खलबते मंत्रिमंडळ विस्तार संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मेघदूत या बंगल्यावर दीड तास चर्चा झाली. मात्र याचर्चेतून कोणताही तोडगा निघाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या बैठकीमध्ये कोणत्या आमदारांना मंत्री पद द्यायचे आणि खाते वाटपावर देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आगामी दोन ते तीन दिवसात हे तिन्ही नेते दिल्लीला जाऊन अमित शहा यांच्याशी चर्चा करतील, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांच्या पक्षात अडीच वर्षांचा फार्मूला राज्यात महायुती सरकारच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे आमदारांमधील अस्वस्थता वाढत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांना मंत्री पदाची पतीक्षा आहे. मागील दोन टर्म पासून मंत्री असलेल्यांना सधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी पक्ष्यातून होत आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अडीच वर्षांचा फार्मूला राबवला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये पहिली अडीच वर्ष हे जुन्या मंत्र्यांना तर पुढील अडीच वर्ष नवीन मंत्र्यांना संधी दिली जाऊ शकते. शिंदेंच्या आमदारांना भाजपचा विरोध शिवसेनेतील काही आमदारांची मंत्रीपदी वर्णी लावण्यात भाजपचा विरोध आहे. त्यामुळे महायुतीतील आमदारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळात वादग्रस्त मंत्री नको आहेत. त्यामुळे शिवसेनेतील काही मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर एकनाथ शिंदे यांना देखील आपल्या जवळच्या आमदारांना मंत्री करायचे आहे. त्यामुळे ते काही मंत्र्यांचा पत्ता कट करतील, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. गृहखात्यावर शिवसेना ठाम मुख्यमंत्री पद भाजपकडे असेल तर गृहमंत्री पद हे शिवसेनेला देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेते आणि एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र, त्यासाठी भाजप तयार नाही. तरी देखील एकनाथ शिंदे अजूनही गृहमंत्री पदावर ठाम असल्याची माहिती शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी दिली. शिंदेंना गृहमंत्री पद मिळण्याची आम्हाला अजूनही आशा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपलाही दिल्लीतून यादीची प्रतीक्षा दुसरीकडे भाजपच्या आमदारांची अस्वस्थता देखील वाढली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप अंतिम झालेली नाही. त्यामुळे भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी देखील अंतिम झालेली नाही. याबाबत दिल्लीतून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. त्यामुळे दिल्लीतील नेत्यांकडून यादी येण्याची प्रतीक्षा भाजपाचे आमदार आणि राज्यातील नेते करत आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये कोणाला मंत्री पदाची संधी मिळणार? याबाबत पक्षामध्ये संभ्रम वाढला आहे. बावनकुळे यांनीही घेतली शिंदेंची भेट महायुतीमधील आमदारांच्या मंत्रिपदावरून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत शिवसेनेला नगर विकास खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Share

-