शिक्षण मंत्री आता ग्रामीण भागातील शाळेतही दिसणार:गरीब पाल्याला चांगले आणि उत्तम शिक्षण देण्याचे उद्दिष्ट, मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया

शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली. शिक्षण मंत्री आता ग्रामीण भागातील शाळांमध्ये दिसेल, असे ते म्हणाले. नेहमीप्रमाणे शिक्षण विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम तुम्हाला दिसेल, असा विश्वासही दादा भुसे यांनी व्यक्त केला. सरकारचे खातेवाटप शनिवारी पार पडले. दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रीपद देण्यात आले आहे. खातेवाटपानंतर कॅबिनेट मंत्री दादा भुसे आपला मतदारसंघ मालेगावात आज दाखल झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्रीपदाबाबत भाष्य केले. शिक्षण विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल, असेही ते म्हणाले. शिक्षण खाते शिंदे साहेबांच्या जिव्हाळ्याचे
शालेय शिक्षण मंत्री आता ग्रामीण भागातील शाळेत दिसणार, तसेच शिक्षण विभागही विविध शाळांना भेट देताना दिसेल, असे नवनिर्वाचित शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणालेत. शिक्षण खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे आहे. याबाबत त्यांनी मला कल्पनाही दिली होती. गरीबातील गरीब पाल्याला चांगले आणि उत्तम शिक्षण देणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल
दादा भुसे यांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ या योजनेवरही भाष्य केले. शालेय गणवेश बाबत बोलायचे झाले तर कालच या विभागाची घोषणा झाली. त्यामुळे काळजी करू नका. या विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल, अशी ग्वाही दादा भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण मंत्री यापुढे तुम्हाला गाव खेड्यांमध्ये शाळांमध्ये व्हिजिट करणारे दिसतील. शिक्षण विभाग देखील शाळेच्या दारी यापुढे नक्कीच दिसेल. एकंदरीत गरिबातील गरीब विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करू, असेही दादा भुसे म्हणाले. पालकमंत्री पदाबाबत काय म्हणाले भुसे?
पालकमंत्री पदासाठी मुख्यमंत्री आणि दोघेही उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद मला मिळावे, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. असेही ते म्हणाले. …त्यावर बोलणे उचित राहणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. याबाबत त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे उघड देखील केली आहे. यांसदर्भात मंत्री दादा भुसे यांना विचारले असता, हा राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे माझ्या सारख्या कार्यकर्त्याने त्यावर बोलणे उचित राहणार नाही, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली.

Share

-