भर सभेत नीतेश राणेंच्या गळ्यात घातली कांद्याची माळ:शेतकऱ्याने माईकवर बोलण्याचा केला प्रयत्न, पोलिसांनी तातडीने घेतले ताब्यात

महायुतीमधील नवनिर्वाचित मंत्री नीतेश राणे नाशिक येथील सटाणा तालुक्यात आले होते. यावेळी त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत बोलत असताना एका शेतकऱ्याने भर सभेत बोलत असताना नीतेश राणे यांना कांद्याची माळ घातल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे. सटाणा येथे सभेत मंत्री नीतेश राणे बोलत होते. यावेळी कांदा उत्पादक शेतकरी अचानक मंचावर आला आणि त्याने थेट कांद्याची माळच राणेंच्या गळ्यात घातली. या नंतर शेतकरी माईकवर बोलण्यास गेला तेवढ्यात पोलिसांनी त्यांला अडवले आणि ताब्यात घेतले. यावेळी नीतेश राणे म्हणाले शेतकऱ्याला थांबवा त्याच्या समस्या ऐकून घेऊ. मात्र, पोलिसांनी तोपर्यंत शेतकऱ्याला ताब्यात घेतले असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, सध्या महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. कांद्याचे दर घसरणीला लागले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. गेल्या दोन आठवड्यात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 1 हजार 900 रुपयांचा दर मिळत आहे. जास्तीत जास्त 2 हजार 800 रुपये मिळत आहेत. सरकारी यंत्रणांमार्फत कांद्याची खुलेआम विक्री होत असली तरी त्याचा पुरवठा पुरेसा होत नाही. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या महिनाभरात किरकोळ दर 60 ते 80 रुपये प्रतिकिलो होते. मात्र, सध्या कांदा 2000 प्रतिक्विंटल ते 2500 रुपयांच्या आसपास विकत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. देशांतर्गत वाढलेली कांद्याची आवक व कांदा निर्यातीत येणारे अडथळे यामुळे कांद्याचे भाव घसरले आहेत. कांदा निर्यातशुल्क तातडीने मागे घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Share

-