आजकाल व्हिडिओ काढतात, वाचवण्याचा प्रयत्न नाही:पुण्यातील घटना फारच विचित्र घडलेली, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

पुणे येथील स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर यातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी 70 तासांत अटक केली आहे. गुनाटी या गावातून आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली.या घटनेवर आता माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अशा घटना का घडतात यावर देखील स्पष्ट मत मांडले आहे. आजकाल व्हिडिओ काढतात, वाचवण्याचा प्रयत्न नाही छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती आहे. त्याच्यामुळे या घटना होणार नाही, त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. शासनाने हे प्रयत्न करायला पाहिजे, पोलिसांनी करायला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांना, प्रत्येक माणसांनी केले पाहिजे. प्रत्येक माणसांमध्ये पोलिस दडलेला असतो. आजकाल काय फोटो काढतात, निघून जातात. लोकांना रस्त्यावर कोयत्याने मारले जाते. फक्त व्हिडिओ काढले जातात. वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. मोकळ्या बसेस आहेत. अंधार आहेत, सिक्युरिटी नाही. त्यामुळे असे घाणेरडे प्रकार तेथे होत आहे. कोणाच्या लक्षात येत नाही, असे थोडी आहे. जाऊद्या आपल्याला काय करायचे असे मनामध्ये विचार येतात त्यातून असे प्रकार घडतात, असे छगन भुजबळ म्हणाले. बंद पडलेल्या बसेस काढल्या पाहिजे पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, पुण्यातील घटना फारच विचित्र घडलेली आहे. पुणे हे विद्येचे, संस्कृतीचा माहेरघर म्हणून देशात परदेशात मान्यता आहे. अशा गोष्टी होणार नाही, यासाठी दक्षता घेतली पाहिजे. काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये बंद पडलेल्या मिलमध्ये जागा मोकळी होती, तेथे अशीच एक घटना झाली. आता सुद्धा तिथे काही बसेस वगैरे बंद अवस्थेत आहे. लाईटची व्यवस्था केली पाहिजे. बंद पडलेल्या बसेस काढल्या पाहिजे. गार्ड सुद्धा ठेवले पाहिजे. तुमचे गार्डन असतील तर टायरपासून सगळेच घेऊन जातील लोक, तिथे अजिबात सिक्युरिटी नसेल तर अशा घटना होतात. समाजात अशा गोष्टींना थारा देता कामा नये छगन भुजबळ म्हणाले, शक्ती कायद्याबद्दल सगळे मागणी करत आहेत, काहीतरी अडचणी असतील. नवीन कायद्यात खरोखर किती अंतर्भाव आहे, तो पण पहावा लागेल. कायदा तर कडक झाला पाहिजे. परंतु लोकांना सुद्धा अशा गोष्टींमध्ये सहज घेता कामा नये. वाचले आणि सोडून दिले एवढे नाही. आपल्या समाजात अशा गोष्टींना थारा देता कामा नये आणि ज्या तऱ्हेने काही गोष्टी तिथे सापडल्या ते पाहता आजच नाही तर कित्येक महिन्यांपासून असे व्यवहार तिथे होतात, असे एकूण मला लक्षात येते, असेही भुजबळ म्हणाले.

Share

-