हमाम में सब नंगे होते है..:विधानसभेत एकही आमदार राहू शकणार नाही, लक्ष्मण हाकेंचे जयकुमार गोरेंना समर्थन

महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील अनेक अनेक मंत्र्यांवर विविध आरोप समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. तर माणिकराव कोकाटे यांच्यावरही टांगती तलवार आहेच. त्यात आता भाजपचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेचा विनयभंग केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, जयकुमार गोरे यांचे समर्थन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, हमाम में सब नंगे होते है, जर जयकुमार गोरे यांचा राजीनामा मागत असतील, न्यायालयासमोर साक्ष देऊन राजीनामा मागत असतील तर महाराष्ट्रातील 288 आमदारांचा राजीनामा घ्यावा लागेल, असे विधान त्यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकही आमदार राहू शकणार नाही. आमदारकी आणि त्यातून पैसा ही पद्धत सुरू असून यातला कोणता आमदार खांदायला गेला होता का, अशा शब्दात लक्ष्मण हाके यांनी जयकुमार गोरे यांचे समर्थन केले आहे. पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, न्यायालयासमोर माफी मागून त्यांना निर्दोष सोडले असेल तर पुन्हा त्यांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे. मात्र, नेत्यांनी सार्वजनिक जीवनात वावरताना आचारसंहिता पाळणे गरजेचे आहे. लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांच्यावर देखील विधान केले आहे, पुरावे असतील तर धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, असे हाके यांनी म्हटले आहे. दरम्यान, जयकुमार गोरे यांनी हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेचा गोरे यांनी छळ आणि विनयभंग केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केले आहे. ते एक विकृत मंत्री आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका स्त्रीचा, मंत्री गोरे यांनी छळ आणि विनयभंग केला आहे, त्याची माहिती समोर आली आहे. ती महिला येत्या काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे. मंत्री जयकुमार गोरेंचे प्रकरण नेमके काय? फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाला आहे. या महिलेने या प्रकरणी योग्य ती कारवाई झाली नाही, तर 17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच हल्लकल्लोळ माजला आहे. पीडित महिलेने यासंबंधी राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. हेही वाचा