शरद पवारांच्या पक्षात मोठा भूकंप:जयंत पाटील लवकरच अजित पवारांसोबत दिसणार; शिवसेना मंत्र्यांचा दावा चर्चेत

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. या संदर्भात मी आधी देखील भाष्य केले होते, असा दावा त्यांनी केला आहे. जयंत पाटील हे लवकरच आपल्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिसतील असे देखील ते म्हणाले. आता संजय शिरसाट यांच्या या दाव्यामुळे जयंत पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा पुन्हा एकदा रंगणार आहे. जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये शेतकऱ्यांच्या मोर्चा दरम्यान केलेले वक्तव्य सध्या राज्यात चांगलेच चर्चेत आले आहे. या माध्यमातून जयंत पाटील यांच्या मनात नेमके काय सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या आधी देखील त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील अशाच चर्चा रंगल्या होत्या. आता जयंत पाटील यांच्याबद्दल पुन्हा चर्चा रंगली आहे. त्यातच आता संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जयंत पाटील यांच्या वक्तव्याने रंगली चर्चा नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी भेट दिली होती. यावेळी जयंत पाटील यांनी मोर्चेकरांना उद्देशून भाषण केले. आपल्या भाषणात बोलताना त्यांनी खळबळजनक विधान केले. माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले होते. जयंत पाटलांच्या या विधानाचा रोख काय? असा प्रश्न त्यांनतर उपस्थित केला गेला. राजू शेट्टींनी एकदा झेंडा घेतला तर ते सोडत नाहीत असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. यावेळी, शेतकऱ्यांनी तुम्ही देखील आंदोलनात हवे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर, माझी गॅरंटी घेऊ नका, माझे काही खरे नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. त्यावर, अनेकांनी भुवया उंचावल्या तसेच त्यांच्या बोलण्याचा रोख काय होता? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतरही झाली होती चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या मुंबई स्थित बंगल्यावर भेट घेतली असून भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने या दोघांची भेट घडवून आणली असल्याचा दावा करण्यात आला होता. जयंत पाटील महायुतीत येत असतील तर त्यांचे स्वागतच – मिटकरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी म्हणाले होते की, शरद पवार गटातील नेत्यांकडून होणारा अवमान तथा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या कारकिर्दीवर उपस्थित केले जाणारे प्रश्नचिन्ह पाहता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असेल. जयंत पाटील एक मोठे नेते आहेत. त्यांना राजकारणाचाही दांडगा अनुभव आहे. त्यांच्या सारखा मोठा नेता आमच्या पक्षात असेल, तर आनंदच आहे. ते महायुतीमध्ये येणार असतील तर एक घटकपक्ष म्हणून आम्ही त्यांचे स्वागतच करू असेही मिटकरी यांनी म्हटले होते. शरद पवार गटाने दावा फेटाळला दुसरीकडे, शरद पवार गटाचे नेते महबूब शेख यांनी जयंत पाटलांच्या पक्षांतराची चर्चा धुडकावून लावली होती. जयंत पाटलांविषयी वावड्या उठवण्याचे काम कायम सुरू असते. पण ते शरद पवारांसोबतच आहेत ही वस्तुस्थिती आहे, असे ते म्हणाले. महबूब शेख यांनी यावेळी जयंत पाटील गत काही दिवसांपासून पक्षात सक्रिय नसल्याचा आरोपही फेटाळून लावला. जयंत पाटील पक्षात सक्रिय आहेत. ते पक्षात सक्रिय नसल्याच्या बातमीत कोणतेही तथ्य नाही. जयंत पाटील हे पवारांसोबत आहेत. ते शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहतील याविषयी कोणतीही शंका नाही, असे शेख म्हणाले होते.