पिंपरी चिंचवड विद्यापीठात बौद्धिक संपदा हक्क चर्चासत्र:5 तासांत 50 कॉपीराइट अर्ज दाखल; कुलगुरूंचे जागरुकतेचे आवाहन

विविध क्षेत्रातील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, कलाकार, चित्रकार, साहित्यिक तसेच समाजातील सर्व बुद्धीजीवी घटकांनी बौद्धिक संपदा, त्याचे हक्क, महत्त्व, व्यावसायिक वापर याविषयी जागरूक रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मणिमाला पूरी यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलच्या सहयोगाने बौद्धिक संपदा हक्क विषयी चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी प्र – कुलगुरू डॉ. सुदीप थेपाडे, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे सहाय्यक प्रा. निखिलेश, विभाग प्रमुख डॉ. वी. एन. पाटील, तज्ज्ञ सहा. प्रा. डॉ. सागर पांडे, प्रा. डॉ. नीरू मलिक आदी उपस्थित होते. प्र – कुलगुरू डॉ. सुदीप थेपाडे यांनी सांगितले की, पीसीयू चे व्यवस्थापन नावीन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन व बौद्धिक संपदेचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहे. आजच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत सर्वांनी आपल्या बौद्धिक संपदेचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याचा व्यवसायिक वापर करून आपले उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. विद्यार्थी व संशोधक, प्राध्यापकांना पेटंट, ट्रेडमार्क, संरक्षित साहित्याचे प्रकार, व्यावसायिक व समाजोपयोगी महत्व त्यातील कायदेशीर बाबी त्याचा उल्लंघनाच्या घटना यावर कायदेशीर उपाययोजना यासारख्या अन्य महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती अशा चर्चासत्रातून मिळते. यावेळी कॉपीराइट टीमच्या प्रयत्नांमुळे अवघ्या पाच तासांत 50 पेक्षा अधिक कॉपीराइट अर्ज दाखल करण्यात आले.हे चर्चासत्र पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन कमिटी सदस्य नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. |