‘माझं काही खरं नाही’ म्हणणारे जयंत पाटील बारामतीत:शरद पवारांची घेतली भेट; म्हणाले – मी नाराज नाही, पण बाहेर बोलायची चोरी झाली

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गत काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. विशेषतः त्यांनी दोन दिवसांपूर्वीच माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका असे विधान केल्यामुळे या चर्चेने चांगलाच जोर धरला होता. त्यानंतर आज सकाळीच त्यांनी बारामतीत येऊन शरद पवारांची भेट घेत या चर्चेला पूर्णविराम दिला. यावेळी बोलताना त्यांनी मी नाराज नाही, पण बाहेर बोलण्याची चोरी झाल्याचे सूचक विधान केले. गत काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू आहेत. पक्षातील तरुण नेत्यांनी असा आग्रह धरला आहे. यामुळे जयंत पाटील नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यातच त्यांनी दोन दिवसापूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये बोलताना ‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही’, असे मोठे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर ते खरेच पक्षांतर करणार काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज बारामती येथे पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. मी नाराज नाही, पण बाहेर बोलायची चोरी झाली या भेटीत जयंत पाटील यांनी शरद पवारांशी बराच वेळ मनमोकळ्या गप्पा मारल्याची माहिती आहे. त्यांनी पवारांसोबत कृषी विज्ञान केंद्राचीही पाही केली. तसेच ऊसाच्या शेतीचीही पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी नाराज नाही. पण मला बाहेर बोलायची चोरी झाली आहे. मी केलेले भाषण काढून बघा. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आला होता, त्यांच्यासमोर भाषण करताना मी सांगितले होते की, कालांतराने मोबदला वाढला तर लोक मावेजा घेतात आणि गप्प बसतात. तुम्ही शेवटपर्यंत ठाम आहात का? राजू शेट्टींनी हे आंदोलन हातात घेतले म्हटल्यावर काही विषय नाही. आंदोलनाला पाठिंबा आहे, हीच भावना होती. पाटील पुढे म्हणाले की, माझ्या भाषणातून मी नाराज आहे आणि पक्ष बदलणार असे म्हटले जात आहे. एका तासामध्ये मी त्यावर स्पष्टीकरण दिले होते. प्रसारमाध्यमांनी ठरवलेले दिसते की मला कुठेतरी ढकलायचे. आमच्या पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांची संख्या कमी असली तरी पवारांवर प्रेम असणारे लाखो लोक आहेत. जो काही पक्षाच्या हिताचा निर्णय आहे, तो आम्ही एकत्रित मिळून घेऊ. जयंत पाटील हे हवेहवेसे वाटणारे नेते – सुप्रिया सुळे तत्पूर्वी, जयंत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना जयंत पाटील यांच्या संभाव्य पक्षांतराविषयी छेडले असता त्यांनी जयंत पाटील हे सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे नेते असल्याचे स्पष्ट केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, जयंत पाटील यांच्यासोबत तासभर चर्चा झाली. राज्याच्या दौऱ्याविषयी आम्ही काही नियोजन केले आहे. एवढी मोठी संघटना व एवढा मोठा पक्ष असूनही त्यांना (अजित पवार गट) जयंत पाटील हवेहवेसे वाटतात. ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे. सुप्रिया सुळे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या विधानावर बोलणे टाळले. ते आमचे विरोधक असून, ते बोलतच राहणार. बुरा ना मानो होली है, असे त्या म्हणाल्या. जयंत पाटलांना आता करमत नाही उल्लेखनीय बाब म्हणजे जयंत पाटील यांचे मन सध्या कशातच लागत नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी केला होता. विशेष म्हणजे स्वतः जयंत पाटील यांनीच नागपूर मुक्कामी ही गोष्ट आपल्याला सांगितल्याचे ते म्हणाले होते. ते म्हणाले होते, जयंत पाटील यांनी एकदा मला नागपूर येथे एक गोष्ट बोलून दाखवली होती. ते म्हणाले होते मुश्रीफ साहेब माझे मन सध्या कशातच लागत नाही. कदाचित सत्तेत नसताना 5 वर्षे पक्ष टिकवणे फार अवघड असल्याची कल्पना त्यांना आली असावी. किंवा त्यांचे मनपरिवर्तन झाले असावे. आता त्यांचे खरेच मनपरिवर्तन झाले का हे त्यांनाच विचारावे लागेल.

Share

-