3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झेडपी निवडणुकीचे वेध:जिल्हा परिषद सदस्यांच्या 66, तर पं. स.च्या 132 जागांसाठी होणार निवडणूक
तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर होण्याचे सूतोवाच देण्यात आले होते. विधानसभेचे निकाल घोषित होताच गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांना आता जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात ५९ वरून ६६ सदस्य संख्यांवर निवडणूक लागण्याचे संकेत आहे. यामध्ये पंचायत समितीचे ११८ सदस्यांवरून १३२ सदस्य वाढवण्यात आले होते. राज्यात बहुतांश जि. प., पं. स., महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक आहे. प्रशासकाच्या कालावधीला तीन वर्षे होत आहेत. ओबीसी आरक्षण त्यानंतर सदस्य संख्येचा अडथळा या निवडणुकांना होता. परंतु, न्यायालयाकडून शासनालाच सदस्य संख्येबाबत प्रतिज्ञापत्र द्यावयाचे होते. मात्र, शासनाकडून अद्यापही प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने या निवडणुका लांबतच गेल्या. मध्येच लोकसभा आणि आता विधानसभेमुळे या निवडणुकांना ब्रेक लागला. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर मात्र नवीन वर्षात या निवडणुका लागण्याचे संकेत होते. केवळ विधानसभेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शनिवारी निकाल घोषित होताच पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आता सुसाट झाले आहेत. त्यांना देखील झेडपी सदस्यांचे डोहाळे लागले आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांना या निवडणुकीचे वेध लागले आहेत. जि. प., पं. स.चे आरक्षण निश्चित करत जागा देखील वाढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाढवलेल्या जागांवरच निवडणुका लागण्याचे संकेत मिळाले आहेत. जिल्हा परिषद सर्कल ५९ वरून ६६, तर पंचायत समिती गण ११८ वरून १३२ केले होते. त्यामुळे याच संख्येवर जानेवारीत निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धामणगाव रेल्वेसह तिवसा, चांदूर रेल्वे पंचायत समितीचा १४ डिसेंबरला संपणार कार्यकाळ जि. प.सह १४ पैकी ११ पंचायत समित्यांवर गत अडीच वर्षांपासून प्रशासक आहे. मात्र जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि तिवसा पंचायत समितीचा कार्यकाळ सुरू असल्याने तेथे पदाधिकारी कार्यरत आहे. परंतु १४ डिसेंबरला या तिन्ही पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच एकाचवेळी १४ ही पं. स.त निवडणुका लागणार आहे.